आता घरपोच मद्यविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:24+5:302021-04-24T04:25:24+5:30
कोल्हापूर : कोरोना साखळी खंडित करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ...
कोल्हापूर : कोरोना साखळी खंडित करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मद्य दुकानेही प्रतिबंधित करण्यात आली आहेत. मात्र, रहिवासी सुविधा असलेली हाॅटेल्स व इतर सर्व उपाहारगृहे व बारमधून घरपोच सुविधा पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता घरबसल्या तळीरामांना मद्य मिळणार आहे.
या सेवेअंतर्गत घरपोच सेवा देणाऱ्या कामगारांची आरटीपीसीआर करणे बंधनकारक आहे. मद्य उत्पादित होत असलेल्या ठिकाणांपासून घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना मद्य पुरवठा करण्यासाठी वाहतूक करण्यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. अनुज्ञाप्तीतून फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच मद्यविक्री करता येणार आहे. दुकाने उघडून तेथेच मद्य विक्री करता येणार नाही. पार्सलही तेथे देता येणार नाही. कोविड आरटीपीसीआर चाचणी झालेल्या व लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांकडूनही मद्य घरपोच देणे बंधनकारक आहे. ही सेवा सकाळी ८ ते रात्री आठ वाजेपर्यंतच देता येणार आहे. याचे पालन न करणाऱ्या मद्य विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. असा इशाराही अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात आला आहे.