ईव्ही चार्जिंगसाठी आता वेगळे कनेक्शन, महावितरणची व्यवस्था; युनिट मागे किती असणार दर?..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 05:14 PM2023-09-04T17:14:13+5:302023-09-04T17:15:10+5:30

राज्यात दहा महिन्यांत वीजविक्रीत तिप्पट वाढ

Now separate connection for EV charging, system of Mahavitaran | ईव्ही चार्जिंगसाठी आता वेगळे कनेक्शन, महावितरणची व्यवस्था; युनिट मागे किती असणार दर?..जाणून घ्या

ईव्ही चार्जिंगसाठी आता वेगळे कनेक्शन, महावितरणची व्यवस्था; युनिट मागे किती असणार दर?..जाणून घ्या

googlenewsNext

कोल्हापूर : राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री जुलै २०२३ पर्यंत १४.४४ दशलक्ष युनिट झाली. या वीजविक्रीत दहा महिन्यात तिप्पट वाढ झाली. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आता पुढचे पाऊल उचलले आहे. या वाहनांसाठी स्वतंत्र वीज कनेक्शन, मीटर आणि दरपत्रक लागू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

महावितरण ही महाराष्ट्रासाठी विद्युतवाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी नोडल एजन्सी आहे. राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री जुलै २०२३ पर्यंत १४.४४ दशलक्ष युनिट झाली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हाच वापर ४.५६ दशलक्ष युनिट होता. विद्युत वाहनांमध्ये चारचाकी, दुचाकी, तिचाकी रिक्षा, मालवाहतूक व्हॅन, ट्रक, बस या वाहनांचा समावेश आहे.

राज्यात महावितरणची आणि खासगी अशी एकूण ३२१४ चार्जिंग स्टेशन आहेत. त्या माध्यमातून वाहनांसाठी झालेली विजेची विक्री ध्यानात घेतली तर तिप्पट वाढ झालेली दिसते. वाहनांसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये राज्यात ४.५६ दशलक्ष युनिट वीजविक्री झाली, मार्च २०२३ मध्ये ही विक्री ६.१० दशलक्ष युनिट तर जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली. २०१८ मध्ये राज्यात ४,६४३ विद्युत वाहनांची विक्री झाली, तर २०२२ मध्ये १,८९,६९८ विद्युत वाहनांची विक्री झाली. राज्यात एकूण विद्युत वाहनांची संख्या २७ लाख, ३८ हजार ५७६ आहे. कोल्हापुरातील दुचाकी विद्युत वाहनांची संख्या १८,६४६ इतकी असून १८०४५ इतकी संख्या चारचाकी वाहनांची आहे.

दरासाठी एकच स्लॅब

विद्युत वाहनांसाठी घरगुती वीज कनेक्शनवरूनच चार्जिंग केले जाते. यामुळे वीज बिल वाढत होते. त्यामुळे महावितरणने आता स्वतंत्रपणे कनेक्शन, मीटर आणि दरपत्रकाची व्यवस्था केली आहे. सध्या घरगुती ग्राहकांना १०० युनिटपर्यंत ४ रुपये ४१ पैसे आकारतात. शंभर युनिटहून जास्त वापर झाल्यास त्याचा दर ९ रुपये ६१ पैसे आहे. विद्युत वाहनांसाठी मात्र एकाच स्लॅबचा दर आकारला जाणार आहे.

पंधरा दिवसांत मिळणार कनेक्शन

एक गाडी चार्ज करण्यासाठी आठ तास लागतात. त्यासाठी ३० युनिट खर्च होतात. आता ई-वाहनांसाठी प्रतियुनिट ६ रुपये ८ पैसे, वहन आकार १ रुपया १७ पैसे आणि स्थिर आकार ७५ रुपये प्रति केव्ही असा दर निश्चित केला आहे. त्यासाठी नवीन वीज मीटर आणि कनेक्शन मात्र घ्यावे लागेल. हे कनेक्शन पंधरा दिवसांत देण्याची सोय महावितरणने केली आहे. त्यासाठी सुमारे पाच हजारांवर खर्च येतो.

Web Title: Now separate connection for EV charging, system of Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.