आता एसटीही होणार कॅशलेस
By admin | Published: April 10, 2017 12:48 AM2017-04-10T00:48:42+5:302017-04-10T00:48:42+5:30
बुकिंगसाठी स्वाइप मशीन : कोल्हापूर विभागाच्या ३३१ बसवर ई टॅग
कोल्हापूर : नोटाबंदीनंतर संपूर्ण देशभरात कॅशलेस व्यवहारसाठी सरकार प्रयत्न करत आहे. काळाची हीच गरज ओळखून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागानेही कॅशलेस व्यवहारासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. टोल भरण्यासाठी कोल्हापूर विभागातील ३३१ एस.टी.च्या बसवर ई-टॅग प्रणाली लावण्यात आली आहे, तर आरक्षणासाठी स्वाइप मशिन्सचा वापर केला जात आहे.
सरकारने ५०० व १००० जुन्या नोटांवरील बंदीनंतर कॅशलेसचा पर्याय सार्वजनिक वाहतूक सेवांकडून निवडण्यात आला आहे. एस. टी. महामंडळाकडूनही कॅशलेसचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. टोलनाक्यांवर टोल भरताना प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यावर पर्याय म्हणून एस. टी. बसवर ‘ई-टॅग’ बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे टोलची रक्कम थेट बँक खात्यातूनच वजा होतेच पण १० टक्के सूट एस. टी. बसना मिळत आहे. ई-टॅग गाड्यांसाठी प्रत्येक टोलनाक्यांवर वेगळ्या बूथची व्यवस्था केली आहे.
याआधीच महामंडळाने आरक्षणासाठी अँड्रॉईड मोबाईल अॅप सुरू केले आहे तर विमान, रेल्वेच्या रिझर्व्हेशन सुविधेप्रमाणे एस.टी.च्या प्रवाशांनाही आॅनलाईन आरक्षणाची सोय आहे तसेच, एसएमएसद्वारे आरक्षण आदी सोयी-सुविधा एस.टी. महामंडळाकडून पुरविल्या जात असताना विविध आगारांतील तिकीट खिडक्यांवर आरक्षण करताना रोखीने व्यवहार केले जात होते. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून कर्मचाऱ्यांसमवेत प्रवाशांचे वादाचे प्रसंग उद्भवत होते. नोटाबंदीच्या काळात आरक्षणादरम्यान प्रवाशांचे होणारे हाल पाहता महामंडळाने संपूर्ण राज्यातील तिकीट बुकिंग खिडक्यांवर स्वाईप मशीन वापरण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कोल्हापूर विभागाने मध्यवर्ती बसस्थानक व संभाजीनगर येथे तिकीट बुकिंग खिडक्यांवर स्वाइप मशिन्स बसविली आहेत. तिकीट खिडक्यांवर डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाईप करून तिकिटांचे शुल्क भरता येणार आहे तसेच विद्यार्थी पासची रक्कम ही स्वाइप मशीनने भरता येणार आहे. (प्रतिनिधी)