आता वनविभागाचाही वाजणार ‘बॅन्ड’, वनगीताचीही रचना होणार
By समीर देशपांडे | Published: March 21, 2023 11:48 AM2023-03-21T11:48:16+5:302023-03-21T11:48:48+5:30
एकीकडे नुकतेच महाराष्ट्र राज्यगीत जाहीर झाल्यानंतर आता वनविभागानेही आपले गीत तयार करण्याचा निर्णय
समीर देशपांडे
कोल्हापूर: एकीकडे नुकतेच महाराष्ट्र राज्यगीत जाहीर झाल्यानंतर आता वनविभागानेही आपले गीत तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही, तर सांस्कृतिक कार्यमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आता वनविभागाचा ‘बॅन्ड’ही तयार करण्यात येणार आहे. यासाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राजा बढे लिखित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताची गेल्या महिन्यात निवड करण्यात आली, तसेच अनेक ठिकाणी पोलिस विभागाचाही स्वतंत्र बॅन्ड असतो. या पार्श्वभूमीवर आता वनगीताचीही रचना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या या विभागाने स्वत:ची सिग्नेचर वनगीत आणि बॅन्डनिर्मिती करण्याचे निश्चित केले आहे. विविध प्रसंगी प्रोत्साहन आणि स्फुरण देण्याकरिता वाजवता येऊ शकेल, तसेच जे वनविभागाला कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर एक वेगळी ओळख मिळवून देण्यास सक्षम ठरेल, असे गीत निवडण्यात येणार आहे.
वनविभागाकडून शाळकरी मुलांसाठी पर्यावरण समस्येबाबत व सद्यस्थितीबाबत विविध उपक्रमांद्वारे माहिती देणे, पर्यावरण संरक्षणाच्या व संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामांमध्ये सहभागी करून घेणे, यासाठी इको क्लब म्हणजेच हरित सेना हा उपक्रम राबविला जातो. या इको क्लबसाठीही युवा, ज्येष्ठ आणि सामान्य नागरिकांच्या माध्यमातून प्रेरणादायी ठरेल, असे गाणे आणि प्रतिज्ञाही तयार करण्यात येणार आहे. यासाठी एका ऑनलाइन स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून, ३० एप्रिलपर्यंत याबाबतच्या प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.
यासाठी घेण्यात येणार स्पर्धा
वनगीताचे बोल, संगीतासह इको क्लबसाठी गाणे, फॉरेस्ट बॅन्डसाठी संगीत आणि इको क्लबसाठी प्रतिज्ञा या चार घटकांसाठी खुली स्पर्धा वनविभागाने आयोजित केली आहे.