पुण्याला जाण्यासाठी दिवसातून सहा ‘शिवाई’ बसेस, दोन महिन्यात किती मिळाले उत्पन्न.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:38 IST2024-12-16T15:35:35+5:302024-12-16T15:38:14+5:30
दिवसेंदिवस शिवाईचा प्रतिसाद वाढत आहे

पुण्याला जाण्यासाठी दिवसातून सहा ‘शिवाई’ बसेस, दोन महिन्यात किती मिळाले उत्पन्न.. वाचा
कोल्हापूर : कोल्हापूर ते पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवाईला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कोल्हापुरातून दिवसभरात १२ फेऱ्या होतात. दोन महिन्यातच शिवाईतून एसटीला १ कोटी ८२ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. दिवसेंदिवस शिवाईचा प्रतिसाद वाढत आहे. कोल्हापूर विभागाच्या ६ आणि स्वारगेटच्या ६ अशा बारा फेऱ्या कोल्हापूर ते स्वारगेट मार्गावर होतात.
राज्य सरकारने ‘ई-शिवाई’ ही बससेवा सुरू केली. पुणे विभागाकडे सध्या ६६ ई-शिवाई बस आहेत. पुणे ते छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर या मार्गावर ई-शिवाई बससेवा देण्यात येत आहे. यापैकी कोल्हापूर विभागातून पुणेकडे सहा शिवाई धावत आहेत.
जिल्ह्यात सहा शिवाई बसेस
कोल्हापूर विभागाने पुणे प्रादेशिक विभागाकडे प्रवाशांच्या केलेल्या मागणीनुसार जादा ई-शिवाईची मागणी केली होती. मात्र विभागाने तूर्त तरी सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या कोल्हापूर-स्वारगेट मार्गावर सहा शिवाई बसेस धावत आहेत.
कोल्हापूर ते स्वारगेट मार्गावर शिवाईच्या वेळा
सकाळी ५ वा, सकाळी ६ वा, सकाळी ७ वा, सकाळी ८ वा, सकाळी ९ वा, सकाळी १० वा, दुपारी २ : ३०, दुपारी ३ : ३०, सायंकाळी ४: ३०, सायंकाळी ५ : ३०, सायंकाळी ६ : ३०, रात्री ७ : ३०
दोन महिन्यांत १ कोटी ८२ लाखांचे उत्पन्न
गेल्या दोन महिन्यांत ई-शिवाईने एसटीच्या महसूलात वाढ झाली. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात एकूण १ कोटी ८२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
चार्जिंग सेंटर
सध्या चार्जिंग सेंटरची संख्या कमी आहे. त्यामुळे ई-शिवाईची संख्याही कमी असल्याचे चित्र आहे. चार्जिंग स्थानकांंत अतिउच्च दाबाचा विद्युतपुरवठा आवश्यक आहे. त्यासाठी महावितरणबरोबर करार झाला आहे. एक बस चार्ज होण्यासाठी किमान एक ते दीड तासाचा कालावधी लागतो. मात्र, अचानक विद्युतपुरवठा खंडित झाल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास चार्जिंग स्थानक बंद पडते. चार्जिंग स्थानकांंची संख्येत वाढ होण्याची गरज आहे.
ई-शिवाईला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर बसेस धावत आहेत. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून महामंडळाच्या ताफ्यात आणखी ई-शिवाई दाखल होण्यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत. - मल्लेश विभुते, स्थानकप्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक