आता बुद्धीने लढण्याची गरज

By admin | Published: December 15, 2015 11:47 PM2015-12-15T23:47:18+5:302015-12-16T00:15:25+5:30

आ. ह. साळुंखे : सांगलीत ‘प्रति शिवाजी राजे उमाजी’ पुस्तकाचे प्रकाशन

Now there is a need to fight with wisdom | आता बुद्धीने लढण्याची गरज

आता बुद्धीने लढण्याची गरज

Next

सांगली : काळ बदलला की कोणत्याही लढ्याचे स्वरूप बदलते. त्यामुळे आताच्या काळात समाजातील जळमटे संपवायची असतील, तर हिंसाचाराच्या मार्गाने जाऊन उपयोग नाही. त्यासाठी बुद्धीच्या जोरावरच लढण्याचा वारसा घ्यावा लागेल, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. येथील भावे नाट्यगृहात विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाच्यावतीने वसंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘प्रति शिवाजी राजे उमाजी’ या पुस्तकाचे प्रकाशन साळुंखे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ‘कॉ. दत्ता देशमुख पुरस्कार’ मिळाल्याबद्दल अ‍ॅड के. डी. शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. बाबूराव गुरव, वसंतराव चव्हाण, अलका शिंदे, मुक्ता चव्हाण उपस्थित होते.
साळुंखे म्हणाले की, त्या-त्यावेळच्या लढ्यांचे स्वरूप वेगवेगळे असते. शस्त्रसाधने, व्यूहरचना अशा सर्वच गोष्टी बदलतात. पूर्वीच्या लढ्यांमध्ये शस्त्रांचा वापर केला जात होता. मात्र कोणतीही लढाई शस्त्रे किंवा हाताची मनगटे लढत नसतात, तर त्यामागची बुद्धीच ती लढाई लढत असते. आजवर याच बुद्धीच्या जोरावर लढाया लढल्या गेल्या. आता हिंसाचाराचा मार्ग उपयोगाचा नाही. खचलेल्या प्रत्येक व्यक्तीने, समाजाने बुद्धीने लढायला शिकले पाहिजे. मुक्त शिक्षणपद्धती नसताना अनेकांनी शिक्षण घेतले. स्वराज्याची लढाई लढताना शिक्षणाचा अडथळा येऊ नये, म्हणून उमाजीही लिहायला, वाचायला शिकले. सद्यस्थितीत मुक्त शिक्षण असताना, आपण प्रत्येकाने शिकले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि उमाजी राजे यांच्या चरित्रात खूप साम्य दिसून येते. स्वराज्याची विलक्षण प्रेरणा उमाजी राजेंनी शिवाजी महाराजांकडून घेतली. गनिमी काव्याची जी पद्धत शिवाजी राजेंनी वापरली, तीच पद्धत उमाजींनी इंग्रजांविरुद्ध लढताना वापरली. परस्त्रीविषयीचा आदर या दोन्ही राजांमध्ये समान होता. उमाजी राजेंनी पुरंदरला राजधानी बनवून तेथेच स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामुळेच त्यांना आद्य क्रांतिकारक म्हटले जाते. दोन्ही राजांच्या काळातील परिस्थिती वेगळी होती. तरीही रणनीती, तत्त्व यांच्यात साम्य होते. रामोशी समाजाला प्रदीर्घ काळापासूनची संघर्षाची, त्यागाची, बलिदानाची परंपरा लाभली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे, असे साळुंखे म्हणाले. लेखक वसंतराव चव्हाण यांनी पुस्तकाविषयी निवेदन केले. (प्रतिनिधी)

ब्रिटिश अधिकाऱ्याला मुजरा!
उमाजी राजेंना पकडण्यापासून त्यांना फाशी देईपर्यंत कॅप्टन मॅकिंटॉश हे ब्रिटिश अधिकारी त्यांच्यासोबत होते. फाशीनंतर त्यांनी उमाजी राजेंविषयीचा वृत्तांत मुंबईच्या गव्हर्नरना सादर केला. त्यांनी दिलेला तो वृत्तांत आणि सर्व माहिती खरी होती. पूर्वग्रहदूषितपणाने त्यांनी माहिती दिली असती, तर खरे उमाजीराजे कळलेच नसते. त्यामुळे या ब्रिटिश अधिकाऱ्याला मानाचा मुजरा केला पाहिजे, असे मत साळुंखे यांनी व्यक्त केले.

लक्षवेधी पोवाडा
पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या शीतल साठे यांनी सादर केलेला पोवाडा लक्षवेधी होता. डॉ. साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि उपस्थितांनी त्यांच्या या पोवाडा सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.

Web Title: Now there is a need to fight with wisdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.