सिटिझन पोर्टलच्या माध्यमातून आता थेट घरातून तक्रार करा,वेबसाईट सुरू : पोलीस मुख्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:00 AM2017-12-24T01:00:00+5:302017-12-24T01:00:21+5:30
कोल्हापूर : पोलीस ठाण्यात दाखल होणारे विविध गुन्हे, अटक आरोपी, हरवलेल्या व्यक्ती, अनोळखी मृत व्यक्तींची माहिती आता नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर
कोल्हापूर : पोलीस ठाण्यात दाखल होणारे विविध गुन्हे, अटक आरोपी, हरवलेल्या व्यक्ती, अनोळखी मृत व्यक्तींची माहिती आता नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच फसवणूक, मारामारी, हुंड्यासाठी छळ, ऐवज किंवा मोबाईल हरवला, चोरीस गेला किंवा पोलिसांविरोधात काही तक्रारी असतील तर घरबसल्या आॅनलाईन पद्धतीने त्या नोंदविता येणार आहेत. या तक्रारींद्वारे तत्काळ गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी पोलीस मुख्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी चोवीस तास दोन कर्मचारी आॅनलाईन काम पाहत आहेत.
जिल्ह्यात ३० पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात सरासरी दोन-चार गुन्हे दाखल होत असतात. एखादी तक्रार द्यायची असेल तर संबंधित व्यक्ती पोलीस ठाण्याकडे धाव घेते. तेथील ठाणे अंमलदार तक्रार दाखल करून घेण्याऐवजी मार्गदर्शन करण्यातच वेळ घालवितात. अखेर तक्रारदाराची कच्ची नोंद घेऊन गुन्हा रजिस्टरवर आणला जात नाही. गुन्हा दाखल न झाल्याने त्याचा शोधही कोणी घेत नाही. तक्रारदार न्याय मिळेल या अपेक्षेपोटी पोलिसांच्या फोनची वाट पाहत असतो; परंतु आठ ते दहा दिवस उलटले तरी पोलीस ठाण्यातून त्यांच्याशी कोणताही संपर्क साधला जात नाही.
अखेर तक्रारदार पुन्हा पोलीस ठाण्याची वाट धरतात. तिथे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळत नाही. वेळ, पैसा खर्च होतोच; त्याशिवाय मानसिक त्रासही खूप होतो. त्यामुळे तक्रारदार वैतागून जातो. आता नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यापर्यंत यावे लागणार नाही, याची काळजी पोलीस दलाने घेतली आहे. त्यांचा वेळ व पायपीट थांबण्यासाठी पोलीस प्रशासनाने ६६६.ेंँंस्रङ्म’्रूी.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल ही वेबसाईट सुरू केली आहे. घरी बसून नागरिकांनी आॅनलाईन तक्रार दिल्यास, तत्काळ तिची दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे तक्रारदारांची होणारी ससेहोलपट आता थांबणार आहे. त्यांची ही तक्रार आॅनलाईन असल्याने ती राज्यभरातील सर्व पोलीस ठाण्यांत दिसणार आहे.
सिटिझन पोर्टलवर उपलब्ध असणारी माहिती
प्रथम खबरी अहवाल पाहणे
अटक आरोपींची माहिती
हरविलेल्या व्यक्तींची माहिती
अनोळखी मृतदेहाची माहिती
फरार व्यक्तींची माहिती
महाराष्टÑ पोलीस घटक स्थळांच्या लिंक
डाउनलोड (अॅप्लिकेशन फॉर्म)
गुन्हे सांख्यिकी माहिती
हरविलेल्या मोबाईलची सूचना देणे
दुर्गा उत्सव / गणेशोत्सव परवानगी
ई-तक्रार केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्र सिटिझन पोर्टलच्या वेबसाईटवरून नागरिकांच्या तक्रारी कोणत्याही अडचणीशिवाय संबंधित पोलीस ठाण्यास पाठविल्या जाणार आहेत. नागरिकांना अनेक सुविधांचा लाभ व तक्रार नोंदविण्यासाठीची सुविधा या वेबसाईटवरून घरबसल्या घेता येणार आहे.
- संजय मोहिते, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर