वर्षारंभीच नृसिंहवाडी भाविकांनी फुल्ल; नववर्ष दिन व सुट्टी मुळे भाविकांचा दत्त दर्शनासाठी ओढा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 05:05 PM2023-01-01T17:05:37+5:302023-01-01T17:06:31+5:30
कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या व श्री दत्ताची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्याला आकर्षण असून वर्षारंभ रविवार सुट्टी च्या योगावर अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
प्रशांत कोडणीकर
कोल्हापूर- कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या व श्री दत्ताची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्याला आकर्षण असून वर्षारंभ रविवार सुट्टी च्या योगावर अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सांगली, मिरज, इचलकरंजी तसेच परिसरातून पहाटेच भाविक व महिलानी थंडी असूनही चालत, दुचाकी गाडीने येवून दत्त दर्शन घेतले. सकाळी ११ वाजले पासून नृसिंहवाडी येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत गेली आणि असलेले पार्किंग फुल होऊन भाविकांनी येण्या – जाण्याच्या मार्गावर दुतर्फा गाड्या पार्क केल्या. येथील दत्त मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ४ वेगवेगळ्या रांगा असूनही दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या. भाविकांनी वेदमूर्ती भैरंभट जेरे पुजारी प्रसादालय येथे महाप्रसादासाठी गर्दी केली.
येथील दत्त देव संस्थानचे वतीने मुखदर्शन, मुख्यदर्शन रांग, कापडी मंडप, सीसीटीव्ही कॅमेरा, ध्वनीक्षेपक यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षा रक्षक आदी व्यवस्था केली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी हजेरी लावली.
भाविकांनी पूजा साहित्य, पेढे, मिठाई खरेदी बरोबरच बासुंदी पिण्यासाठी गर्दी केली. येथील सर्वच खानावळी गर्दीने फुलल्या होत्या. दत्त मंदिरात पहाटे ५ वाजता काकडआरती, सकाळी 8 ते १२ यावेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी १२.३० वाजता महापूजा, ३ ते ४ पवमान पंचसुक्त पठण, रात्रो 8 वाजता धूप, दीप आरती व पालखी सोहळा संपन्न होऊन १० वाजता शेजारती करणेत आली.
सेल्फी फोटो साठी ठिकठिकाणी गर्दी
युवक युवतींसह अनेक भाविकांनी मंदिर व परिसर, नदीकाठ, आदी ठिकाणी फोटो व सेल्फी फोटो काढण्यासाठी गर्दी केली.