नृसिंहवाडी-खिद्रापूर जलवाहतूक योजना कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:03+5:302021-03-10T04:25:03+5:30
राज्य सरकारने नुकतेच खिद्रापूर येथील कोपेश्वर विकासासाठी १२ कोटी रुपये मंजूर केले. यापूर्वीही मंदिर परिसरात अनेक विकासकामे झाली आहेत. ...
राज्य सरकारने नुकतेच खिद्रापूर येथील कोपेश्वर विकासासाठी १२ कोटी रुपये मंजूर केले. यापूर्वीही मंदिर परिसरात अनेक विकासकामे झाली आहेत. याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविले गेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दहा वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे येणाऱ्या लाखो पर्यटक भाविकांना खिद्रापूर पाहता यावे यासाठी नृसिंहवाडी ते खिद्रापूर कृष्णा नदीतून जलवाहतूक सुरू करण्याच्या योजनेचे २०१० साली घोषणा झाली होती. या योजनेत नृसिंहवाडी ते राजापूर बंधारा असा जलवाहतुकीचा मार्ग होता. पुढे बंधारा ते मंदिर पाचशे मीटर पायी जाण्याचा मार्ग बनविण्यात येणार होता. मात्र काही कारणाने ही योजना रेंगाळते आहे. त्यामुळे ही योजना सुरू करून नृसिंहवाडी-खिद्रापूर जलमार्गाने जोडावे. यातून राजापूर, अकिवाट, आलास, बुबनाळ व कर्नाटकातील मंगावती ही गावे देखील या योजनेतून नृसिंहवाडीला जोडले जातील.
याबरोबरच कृषी पर्यटन हा व्यवसाय देखील या भागातील शेतकऱ्यांना करता येईल. खिद्रापुरातील केळी या मुख्य पिकाला बाजारपेठ उपलब्ध होईल. येणाऱ्या पर्यटकांनाही जलवाहतूक कृषी पर्यटन पुरातन मंदिराला भेट अशी मेजवानी मिळेल. त्यामुळे ही जलवाहतूक योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.