अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानासाठी नूलच्या खेळाडूंचा एल्गार

By admin | Published: February 10, 2016 12:49 AM2016-02-10T00:49:36+5:302016-02-10T00:56:43+5:30

आंदोलनाचा इशारा : जिल्ह्यात मातीच्या मैदानावर अन् राज्य, राष्ट्रीय पातळीवर अ‍ॅस्ट्रोटर्फवर खेळ

Null players' Elgar for AstroTro Hockey hockey | अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानासाठी नूलच्या खेळाडूंचा एल्गार

अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानासाठी नूलच्या खेळाडूंचा एल्गार

Next

संजय थोरात -- नूल --कोल्हापुरात हॉकीच्या अ‍ॅस्ट्रोटर्फ मैदानाच्या मागणीचे भिजत घोंगडे गेल्या १२ वर्षांपासून तसंच आहे. खेड्यात मातीच्या मैदानावर हॉकी खेळायची अन् राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर अ‍ॅस्ट्रोटर्फवर खेळायचे. त्यामुळे महाराष्ट्राचा पराभव होतो, याची खंत मनाला बोचत असल्याने नूल (ता. गडहिंग्लज) येथील हॉकी खेळाडूंनी अ‍ॅस्ट्रोटर्फ मैदानासाठी ‘एल्गार’ पुकारला आहे. मैदान झाले नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा खेळाडूंनी दिला आहे.
जिल्ह्याला हॉकीची उज्ज्वल परंपरा आहे. सध्या जिल्ह्यात पुरुष व महिलांचे ३० संघ आहेत. नूल (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलने ही परंपरा गेली ४० वर्षे जोपासली आहे. राष्ट्रीय पातळीवरील ३५० खेळाडू या शाळेने घडविले आहेत. मात्र, अत्याधुनिक मैदानाअभावी येथील खेळाडूंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
दरवर्षी या शाळेतील ८ ते १० खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड होते. त्यापूर्वी हे खेळाडू जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय सामने मातीच्या मैदानावर खेळतात. मात्र, राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा झाली की इतर राज्यांबरोबर ‘अ‍ॅस्ट्रोटर्फ’ मैदानावर खेळावे लागते. अशा अत्याधुनिक मैदानावर खेळण्याचा सराव नसल्याने परिणामत: महाराष्ट्राचा पराभव होत आला आहे. अनेक गटात गेली कित्येक वर्षे महाराष्ट्राचा संघ याच कारणामुळे स्पर्धेतून बाद झाला आहे. त्यामुळे ‘अ‍ॅस्ट्रोटर्फ’ मैदानाची नूल येथील खेळाडूंची कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे.
कोल्हापूर जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष विजय साळोेखे (सरदार) यांनी ‘कोमनपा’त नगरसेवक असताना मोठ्या कष्टाने कोल्हापुरात मेजर ध्यानचंद स्टेडियमची उभारणी केली. या मैदानावर नूलसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडू स्पर्धेदरम्यान सराव करतात. मात्र, या मैदानावर ‘अ‍ॅस्ट्रोटर्फ’ची मागणी धूळ खात पडून आहे. कबड्डी, खो-खो, फुटबॉल, बास्केटबॉलसारखे खेळ अत्याधुनिक मैदानावर होतात. मात्र, भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीकडे मात्र राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या भावना खेळाडू, प्रशिक्षकांतून व्यक्त होत आहेत.


चौदा वेळा राष्ट्रीय स्तर व एकदा इंडिया कॅपसाठी खेळले. सर्व सामने अ‍ॅस्ट्रोटर्फवर झाले. मातीच्या मैदानावर सवय असल्याने अ‍ॅस्ट्रोटर्फवर खेळताना त्रास झाला. महाराष्ट्रात अशी मैदाने व्हावीत. कोल्हापुरात अत्याधुनिक मैदानाची गरज आहे.
- स्नेहल लगळी, राष्ट्रीय हॉकी खेळाडू


गेली बारा वर्षे अ‍ॅस्ट्रोटर्फसाठी झगडतोय. लोकप्रतिनिधींना निवेदन, प्रस्ताव दिले. मात्र, कोणीही दखल घेतली नाही. केंद्रीय क्रीडा मंत्री आणि राजीव गांधी फौंडेशनचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे या मागणीची फाईल दिली आहे. महापालिकेने यासाठी प्रयत्न करावा.
- विजय साळोेखे (सरदार), अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा हॉकी असोसिएशन.

लोकप्रतिनिधींनी केंद्र व राज्य शासनाकडून मैदानासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. खेड्यातील खेळाडूंना सुविधा निर्माण करून द्याव्यात. या मागणीवर वेळप्रसंगी आंदोलन हाती घेणार आहे.
- विनोद नाईकवाडी, हॉकी संघटक, उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा हॉकी असोसिएशन.


शिवाजी विद्यापीठाने अ‍ॅस्ट्रोटर्फ मैदानासाठी प्रयत्न करावेत. विद्यापीठाला हॉकीत नावलौकिक मिळवायचा असेल, तर अशा मैदानाची गरज आहे.
- तानुबाई चव्हाण, राष्ट्रीय हॉकी खेळाडू, शिवाजी विद्यापीठ.

Web Title: Null players' Elgar for AstroTro Hockey hockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.