सुन्न आणि अस्वस्थ भोवताल

By admin | Published: February 16, 2015 11:59 PM2015-02-16T23:59:56+5:302015-02-17T00:06:09+5:30

सिटी टॉक--

Numb and unhealthy surroundings | सुन्न आणि अस्वस्थ भोवताल

सुन्न आणि अस्वस्थ भोवताल

Next


एखादी सकाळ प्रसन्नपणे उगवते पण क्षणात काहीतरी होतं आणि ती सकाळ अस्वस्थ वर्तमानाची जाणीव करून देते. कुणीतरी असंख्य सुयांनी टोचून-टोचून घायाळ करत राहतं. कालही असंच झालं. पानसरे सरांवरील हल्ल्याची बातमी आली आणि सुन्न व्हायला झालं. एका आठवड्यापूर्वीचं चिंचवडच्या साहित्य संमेलनातले त्यांचे भाषण आठवले. महात्मा गांधीजींच्या हत्येचा निषेध करताना पानसरे सरांनी तिथे काढलेल्या महात्मा गांधीजींच्या रांगोळीचा संदर्भ देत नथुराम गोडसेच्या रांगोळ्या घालण्याची वेळ येऊ नये, अशी इच्छा व्यक्त केली. ते सारंचं आठवत राहिलं...तेव्हाच आठवली अशीच एक रात्र तेवीस-चोवीस वर्षांपूर्वीची...२१ मे १९९१... मी एकटीच रात्री अभ्यास करत बसले होते...गेट वाजलं म्हणून मी खिडकीतून पाहिलं तर कुणीतरी बाबांना हाक मारत होतं. ‘आॅफिसातून आलोय...सरांना उठवा...’ मी लाईट लावला आणि बाबांना उठवलं.. दोघेजण बाबांच्या आॅफिसातील पत्रकार होते...‘साहेब, बातमी वाईट आहे..श्रीपेरूंबद्दूर येथे राजीव गांधींची हत्या झाली आहे...’ अरे काय सांगतोस..? ‘बाबा मटकन खालीच बसले. दादा, आई दोघेही तोवर जागे झाले होते...त्याकाळी आजच्यासारखे फोन, ब्रेकिंग न्यूज काहीच नव्हते...क्षणात वडील सावरले. आईने आणून दिलेले पाणी प्यायले आणि कपडे घालून तयार झाले. ‘तुम्ही निघा, मी येतोच..’ म्हणत त्यांनी दादाला गाडी काढायला सांगितली. आईला आणि मला सावधगिरीच्या सूचना देऊन ते आॅफिसला गेले. बाबा नागपुरातील एका अग्रणी वृत्तपत्राचे संपादक असल्यामुळे त्यांचे काम आता सुरू होणार होते...सगळा मजकूर बदलून टाकून पुन्हा नव्याने लिहिणे भाग होते. अग्रलेख, पहिलं पान...आजच्यासारखे संगणकावर मजकूर लिहिला जात नव्हता, हाताने सर्व लिहावे लागायचे...बाबांना यायला पहाट झाली...आणि थोड्याच वेळात दारात वृत्तपत्रही हजर झालं...ती सगळी सकाळ उदासवाणी गेली...भारताच्या राजकीय पटलावरचं एक उमदं नेतृत्व अतिरेक्यांच्या हल्ल्यात नाहीसं झालं होतं...वातावरणात एक अस्वस्थ करणारी शांतता होती...लोकांच्या मनात काहीच वर्षांपूर्वी झालेल्या इंदिराजींच्या हत्येवेळी देश हळहळला होता...इंदिराजींचं पार्थिव लोकांनी दूरदर्शनवर पाहिलं होतं, पण राजीव गांधींच्या मारेकऱ्यांनी एक क्रूर खेळी खेळली होती...नेत्याच्या मृत्यूनंतर त्याचा चेहरा पाहून नेत्यांचे चाहते स्फूर्ती घेतात, लोकांच्या आठवणीत तोच चेहरा राहतो. पण राजीव गांधींचा चेहरा बॉम्बने उद्ध्वस्त केला होता. त्यामुळे लोकांना त्यांच्या पार्थिवाचे दर्शन नाही घेता आले....त्यांच्या मुलांना आणि पत्नीला कदाचित सगळ्यात याच गोष्टीचे दु:ख झाले असेल...आपल्या मृत वडिलांचा चेहराही शेवटी पाहता येऊ नये यासारखे दु:ख ते कोणते...समाज ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांच्या शब्दाला मानतो आणि ज्यांच्या विचारांवर आयुष्याची दिशा बदलतो त्या माणसांची काही लोकांना अडचण होते...अशा लोकांना विचारांनी थोपवता येत नसले की त्यांची हत्या होते. सॉक्रिटिस, येशू ख्रिस्त, संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी, जॉन एफ. केनेडी ही यादी बरीच मोठी आहे, त्यात भरच पडत राहणार आहे, अशी भीती दाटून येऊ लागली आहे...विचारवंत, कलाकार, चित्रकार, लेखक, लोकनेते यांचा विचारांनी मुकाबला होणार की त्यांना अतिरेकी विचारांच्या, भ्याड राक्षसाच्या पिस्तुलातील गोळ्यांचा बळी व्हावे लागेल हाच येणाऱ्या काळातील महत्त्वाचा मुद्दा असेल.
जगातले वातावरण बदलते, कुण्या मलालावर हल्ला झाला की आपण हळहळतो, पण ही गोष्ट आपल्या आसपास घडते तेव्हा आपली झोप उडते, तरीही काही लोक याचा आपल्याशी काही संबंध नसल्यासारखे वागतात. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये तर आपल्याला काय करायचे, अशी मानसिकता दिसते, तरीही सर्वांनाच या असंवेदनशीलतेचे चटके सोसावे लागतात. रस्त्यात एखादा माणूस अपघात होऊन जखमी झालेला दिसत असेल तर आपण ‘बघ्याची भूमिका’ घेतो आणि आॅफिसला उशीर होतो म्हणून गाडीचा वेग वाढवतो. शेजारच्या घरातून स्त्रीच्या रडण्याचा आवाज येत असेल, तर आपण आपल्या टीव्हीचा आवाज मोठा करतो आणि हा त्यांचा घरचा मामला आहे म्हणून कान झाकून घेतो. भोवताल असा असंवेदनशील असताना काही माणसे उगाच जगाची काळजी करतात, लोकांना चांगल्या-वाईटमधील फरक समजावू इच्छितात. हीच सहृदयी, वेगळी माणसे स्वत:साठी काट्यांची वाट निवडतात...पानसरे सर त्यातलेच एक...! या क्षणी त्यांच्यासाठी सगळेजण प्रार्थना करूया..आपल्याला जगण्याचा नवा अर्थ उमगतो का पाहूया.... - प्रिया दंडगे

Web Title: Numb and unhealthy surroundings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.