बॅलेटवरील क्रमांक; महाडिक दोन, तर मंडलिक तीन नंबरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:48 AM2019-04-09T00:48:19+5:302019-04-09T00:48:24+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक (चिन्ह-घड्याळ) यांचे नाव इव्हीएम मशीनवरील बॅलेट पेपरवर दोन ...
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक (चिन्ह-घड्याळ) यांचे नाव इव्हीएम मशीनवरील बॅलेट पेपरवर दोन नंबरवर, तर शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक (चिन्ह-धनुष्यबाण) यांचे नाव तीन नंबरवर येणार आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणेने ही माहिती दिली.
चिन्हांचे वाटप व बॅलेटवरील नावांचा क्रम निश्चित करताना राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, नोंदणीकृत अमान्यता पक्ष आणि मराठी आद्याक्षरानुसार अपक्ष उमेदवार असा लावला जातो. त्यानुसार कोल्हापूर मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डी. श्रीकांत (चिन्ह : हत्ती) यांचे नाव प्रथम क्रमांकावर असेल. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी (चिन्ह : कपबशी) यांचे नाव चौथ्या क्रमांकावर असेल. त्यानंतर किसन केरबा काटकर (बळिराजा पार्टी- चिन्ह जेवणाचे ताट), दयानंद कांबळे (बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी-एअर कंडिशनर) व नागरत्न सिद्धार्थ (बहुजन मुक्ती पार्टी-चिन्ह खाट) अशी चिन्हे मिळाली. त्यानंतर इतर अपक्षांना इतर चिन्हांचे वाटप झाले.
बॅटसाठी चिठ्ठ्या..
हातकणंगले मतदारसंघात खासदार शेट्टी यांचे चिन्ह बॅट असल्याने कोल्हापूर मतदारसंघात बॅटसाठी चुरस राहिली. राजेंद्र कोळी व संदीप कोगले यांच्यात बॅटसाठी चुरस झाली. म्हणून चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. चिठ्ठीत कोगले यांना बॅट मिळाली.
इलेक्ट्रॉनिक बॅलेट आज रवाना
निवडणूक कामातील कर्मचारी व माजी सैनिकांचे कोल्हापूर मतदारसंघात ६१५१ व हातकणंगले मतदारसंघात ३९९२ मतदार आहेत. त्यांना आज मंगळवारी इलेक्ट्रॉनिक बॅलेट पाठविण्यात येणार आहेत. त्यांनी मतदान करून त्याची स्लीप पोस्टाने परत पाठवायची आहे.
‘कोल्हापूर’ अपक्ष उमेदवारांची चिन्हे अशी
परेश भोसले (गॅस सिलिंडर), बाजीराव नाईक (हेलिकॉप्टर), अरविंद माने (पेनाची निब सात किरणांसह), मुश्ताक मुल्ला (शिट्टी), युवराज देसाई (कपाट), राजेंद्र कोळी-गळतगे (किटली), संदीप संकपाळ (अंगठी).
‘हातकणंगले’ अपक्ष उमेदवारांची चिन्हे अशी
आनंदराव सरनाईक (चिन्ह-बॅटरी टॉर्च), विद्यासागर ऐतवडे (चिन्ह-हेलिकॉप्टर), विश्वास कांबळे
(गॅस सिलिंडर), किशोर पन्हाळकर (सीसीटीव्ही कॅमेरा), डॉ. नितीन भाट (संगणक), रघुनाथ पाटील (किटली), महादेव जगदाळे (हिरा), विजय चौगुले (हॉकी व बॉल), संग्रामसिंह गायकवाड (पेन ड्राईव्ह), संजय अग्रवाल (आॅटो रिक्षा)