चिकोत्रा खोऱ्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:56+5:302021-06-17T04:16:56+5:30
सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्यातील सेनापती कापशीसह (ता. कागल) वडगाव, बाळिक्रे, हसूर खुर्द, कासारी, माद्याळ, बाळिक्रे, जैन्याळ, आलाबाद, बेलेवाडी ...
सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्यातील सेनापती कापशीसह (ता. कागल) वडगाव, बाळिक्रे, हसूर खुर्द, कासारी, माद्याळ, बाळिक्रे, जैन्याळ, आलाबाद, बेलेवाडी मासा, बाळेघोल आदी गावांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने लोकांनी धास्ती घेतली आहे. आजपर्यंत चिकोत्रा खोऱ्यात चारशे वीस रुग्ण पाॅझिटिव्ह आले असून, सध्या दोनशेच्यावर रुग्ण विविध दवाखान्यांत उपचार घेत आहेत.
ग्रामीण भागातील शेतकरी वर्गामध्ये कोरोनाचा फैलाव होत आहे. परिणामी अनेक गावांत कुटुंबातील सर्वच सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. सेनापती कापशीसह परिसरात दुसऱ्या लाटेत सुमारे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. परिसरातील ग्रामीण भागातही दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागात स्थानिक पातळीवरील डॉक्टरांना कोरोना उपचाराचा अनुभव नाही. योग्य उपचार व सल्ला मिळत नसल्याने आगदी शेवटच्या क्षणाला रुग्णाला पुढील दवाखान्यात हलवले जात आहे. पहिले आठ दिवस स्थानिक पातळीवरील उपचारात हलगर्जीपणा झाल्याने अनेक रुग्णांना आपले जीव गमवावे लागले. अनेक घरातील कुटुंब प्रमुखच कोरोनाचे बळी पडल्याने चरितार्थ चालविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन गावातील डॉक्टरांकडून होत आहे काय? हे पाहणे गरजेचे आहे. अन्यथा मृत्यूचे प्रमाण कमी करणे अशक्य आहे.
सेनापती कापशी येथे शशिकांत खोत व उमेश देसाई यांनी सुरू केलेल्या दोन्हीही सुसज्ज कोविड सेंटरमुळे या परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे कागल कोविड सेंटरवरील ताण कमी झाला आहे. रानडे हायस्कूल व इंदुमती स्कूलमधील कोविड सेंटरमध्ये सुमारे ८० रुग्ण उपचार घेत आहेत.