कोरोना रुग्णसंख्या आली दहा हजारांच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:08+5:302021-06-22T04:18:08+5:30
कोल्हापूर : गेल्या वीस दिवसात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार १५ ...
कोल्हापूर : गेल्या वीस दिवसात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार १५ वरून ९ हजार २४१ पर्यंत खाली आल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु मृत्युदर खाली येत नसल्याने प्रशासनाची ही चिंता अजूनही कायम आहे.
मे २०२१ मध्ये एका महिन्यात तब्बल ५० हजारांहून अधिक नागरिक कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. हा महिना घातक महिना ठरला होता. त्यानंतरही जून महिन्यात सुरुवातीपासूनच रुग्णसंख्या वाढतीच राहिली आहे. मृत्यू पावलेल्यांचीही संख्या अपवादात्मक दिवस सोडले तर ३०च्या वरच राहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठ दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. निर्बंध आणखी कडक करा, असेही सांगितले होते. त्यानुसार चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या ही कमी येत नसल्याने एक दिलासादायक परिस्थिती दिसून येत आहे. यात सातत्य राहिल्यास पुढील महिन्यात कोरोनाचे रुग्ण आणखी मोठ्या प्रमाणावर कमी आल्याचे चित्र पहावयास मिळू शकते.
३१ मे २०२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात १६ हजार ०१५ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत होते. परंतु त्यानंतर किमान दहा दिवस नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत गेल्याने सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात ९ हजार २४१ रुग्ण सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले. ३ जूनला कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा १९.२३ टक्के इतका होता. तो. १८ जून रोजी १०.९ टक्के इतका कमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासात हा दर १०.५३ इतका नोंदवण्यात आला आहे.
एकूणच गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्हिटी दर कमी येत असल्याचे चित्र आहे. १ जून ते १६ जून या सोळा दिवसात कोरोना पॉझिटिव्हिटी तर हा १२ टक्क्यांपेक्षा कधीच कमी आला नव्हता. मात्र आता गेले तीन दिवस हाच दर ११ टक्क्यांहून खाली आला आहे.
चौकट
दिनांक चाचण्या पॉझिटिव्ह टक्केवारी
१५ जून ७९२७ ११८१ १४.९
१६ जून ८७४५ १४१७ १६.२
१७ जून ९०६१ ११६४ १२.८५
१८ जून ९४६४ १०३२ १०.९
१९ जून ९६७३ १०४१ १०,७६
चौकट
दिनांक कोरोना मृत्यू
१५ जून २८
१६ जून ३४
१७ जून ३९
१८ जून ३४
१९ जून ३७
२० जून ३६
२१ जून ३३
चौकट
नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
ही संख्या जरी कमी येत असली तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. प्रशासनाने नियम शिथिल केले आहेत याचा अर्थ सरसकट कुणीही, कुठेही, कितीही वेळ फिरावे असा होत नाही. मास्कच्या बाबतीतही हलगर्जीपणा दिसून येत आहे. अनेकजण लावायचा म्हणून मास्क लावतात. हे घातक आहे. त्यामुळे प्रशासन एकीकडे त्यांचे काम करत असताना नागरिकांनीही तितकीच दक्षता घेण्याची गरज आहे.
चौकट
दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान.....असे नको
राजकीय नेते मंडळी एकीकडे सर्व नियम पाळा म्हणून सांगतात आणि दुसरीकडे त्यांनीच आयोजित केलेले कार्यक्रम टीकेचे विषय ठरत आहेत. त्यामुळे जनतेला आपण काही सूचना पाळायला सांगत असताना त्या आपल्यालाही लागू होतात याचेही भान सर्वांनी ठेवायला हवे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात पुन्हा नियम कडक करावे लागतील, असा इशारा दिला होता आणि तिकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालय उद्घाटनाला हजारो कार्यकर्त्यांनी अशी गर्दी केली की त्यातून अजित पवार यांना वाटही काढताना दमछाक झाली. या विरोधाभासाची चर्चा सुरू आहे.