सुधारित जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या लागली वाढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:24 AM2021-02-13T04:24:02+5:302021-02-13T04:24:02+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे गेल्या २४ तासांत नवे २२ रुग्ण आढळले असून, त्यामध्ये कोल्हापूर शहरातील १३ रुग्णांचा समावेश आहे. ...
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे गेल्या २४ तासांत नवे २२ रुग्ण आढळले असून, त्यामध्ये कोल्हापूर शहरातील १३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दहा ते पंधरा रुग्णांची संख्या येत असताना अचानक २० च्या पुढे रुग्णांची संख्या असल्याने अजूनही काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
या २२ रुग्णांमध्ये नगरपालिका क्षेत्रातील दाेन आणि इतर जिल्ह्यातील चार, चंदगड, गगनबावडा आणि हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे. दिवसभरामध्ये ३०४ जणांची तपासणी करण्यात आली असून, ६७८ जणांचे स्वॅब घेण्यात आले, तर १९२ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. १३४ जणांवर उपचार सुरू असून, ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जानेवारी २०२१ पासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली. मृत्यूची संख्याही घटली आहे. सरासरी १० ते १५ नवे रुग्ण रोज आढळत आहेत. गेल्या आठवड्यात तर २४ तासांत फक्त तीनच नवे रुग्ण सापडले होते. त्यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले; परंतु शुक्रवारी संध्याकाळी आलेल्या अहवालात २२ नागरिक पाझिटिव्ह आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे.
विदर्भामध्ये पुन्हा रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. साताऱ्यातही आकडे वाढू लागले आहेत. त्यामुळे नवे कोरोनाचे रुग्ण २२ वर गेल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्या जी काही दिवसांपूर्वी १०० च्या आत होती ती आता १३४ वर गेली आहे. अजून आठ दिवस नव्या रुग्णांची आकडेवारी पाहून मग याबाबत अंदाज बांधणे शक्य असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
बेफिकिरी नको
कोरोना संपला म्हणून बेफिकिरी नको, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अजूनही नियम आणि पथ्ये पाळूनच नागरिकांना रहावे लागेल. शाळा सुरू झाल्या आहेत. महाविद्यालये सुरू होत आहेत. गर्दी वाढली आहे; परंतु वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे.