जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची सदस्य संख्या निश्चित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:29+5:302021-06-09T04:29:29+5:30
संदीप बावचे लोकमत न्यूज नेटवर्क जयसिंगपूर : पुढीलवर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य ...
संदीप बावचे
लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : पुढीलवर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य संख्या व लोकसंख्या निश्चितीकरणाची कार्यवाही सुरु झाली आहे. २०११च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येची माहिती पाठविण्याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका सन २०२२मध्ये होणार आहेत. जिल्हा परिषदेची मुदत २० मार्चला तर पंचायत समित्यांची मुदत १३ मार्चला संपणार आहे. त्यामुळे मुदत संपण्याअगोदर सार्वत्रिक निवडणुका घेण्याकरिता त्यांची सदस्य संख्या निश्चित करावी लागणार आहे.
त्यामुळे २०११च्या जनगणनेनुसार प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्येची माहिती आवश्यक आहे. ग्रामीण लोकसंख्येमधून नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका, नगर पंचायती तसेच महानगरपालिकेच्या हद्दवाढ क्षेत्राची लोकसंख्या वगळून ग्रामीण लोकसंख्येची माहिती प्रपत्राव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरु झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा अजून नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती पातळीवर नव्या निवडीदेखील होणार आहेत. त्यातच निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्य संख्या व ग्रामीण लोकसंख्या याची प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरु झाल्यामुळे ज्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या जागा रिक्त आहेत, त्याठिकाणच्या पोटनिवडणुका होणार का, याबाबत सध्यातरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकूण लोकसंख्येचा अहवाल देण्याच्या सूचना
जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय पंचायत समितीचे नाव, एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या, अनुसूचित जमातीची लोकसंख्या व संपूर्णत: अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे का किंवा नाही, असा अहवाल पाठविण्याच्या सूचना संबंधित तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.