हागणदारी मुक्तीत जिल्हा राज्यात नंबर एक
By admin | Published: February 9, 2016 12:48 AM2016-02-09T00:48:21+5:302016-02-09T00:57:02+5:30
\चार तालुके शंभर टक्के : संपूर्ण हागणदारी मुक्तीचे जिल्हा परिषदेचे नियोजन
कोल्हापूर : हागणदारीमुक्त ग्रामपंचायत अभियानात राज्यात कोल्हापूर जिल्हा नंबर एकवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील १०२९ पैकी ६१३ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. आता संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने व्यापक नियोजन केले आहे. दरम्यान, गगनबावडा, आजरा, पन्हाळा, भुदरगड हे चार तालुके शंभर टक्के हागणदारीमुक्त झाले आहेत.
राज्य शासनाने पहिल्यांदा ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानानंतर आता हागणदारीमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविले जात आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजनेतून जिल्ह्यात हागणदारीमुक्त अभियानाची सुरुवात १५ आॅगस्ट २०१५ पासून झाली आहे. गावात कोठेही मानवी विष्ठा दिसणार नाही, वैयक्तिक व सामूहिक ठिकाणी सुरक्षित तांत्रिक पर्यायांद्वारे विष्ठेची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे, स्थलांतरित कुटुंबांनाही शौचालयाची सुविधा असणे, किमान ९० टक्के कुटुंबांकडे शौचालय असणे, प्रत्येक व्यक्तीकडून शौचालयांचा वापर करणे, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, शाळा येथे चांगल्या स्थितीमध्ये शौचालय असणे, असे निकष हागणदारीमुक्त ग्रामपंचायतीसाठी आहेत. हे निकष पूर्ण केल्यानंतर ग्रामपंचायतीने स्वत:च गावसभेत हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करावयाची आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्णातील ६१३ ग्रामपंचायतींनी हागणदारीमुक्तीची घोषणा केली आहे.
हागणदारीमुक्त ग्रामपंचायती करण्यात कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात नंबर वनवर पोहोचली आहे. आता संपूर्ण जिल्हाच हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ग्रामस्थ, जिल्हा परिषद पदाधिकारी यांचे सहकार्य मिळत आहे.
- अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी
अधिकारी, जिल्हा परिषद.
पहिले पाच जिल्हे..
राज्यातील हागणदारीमुक्त जिल्हे व कंसात ग्रामपंचायतींची संख्या अशी : कोल्हापूर (६१३), सातारा (६०४), सिंधुदुर्ग (४१९), रत्नागिरी (३७६), पुणे (२७४).