ऊस गाळपात राज्यात ‘सोलापूर’च भारी, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’ कारखाना अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 11:36 AM2022-01-12T11:36:52+5:302022-01-12T11:37:17+5:30
हंगाम वेळेत सुरू झाला असला तरी परतीचा पाऊस आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर थोडा परिणाम झाला होता.
कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम निम्यावर आला असून, गेल्या अडीच महिन्यांत राज्यात ५ कोटी ५६ लाख टन उसाचे गाळप होऊन ५ कोटी ४८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपामध्ये यंदा पहिल्यांदाच सोलापूर विभागाने आघाडी घेतली असून १ कोटी ३२ लाख ८३ हजार टनांचे गाळप केले आहे. कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर असून ‘जवाहर’ कारखाना राज्यात अव्वल ठरला आहे.
साखर कारखान्यांच्या यंदाच्या हंगामात ऊस दरावरून ताणाताणी झाली नाही. हंगाम वेळेत सुरू झाला असला तरी परतीचा पाऊस आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर थोडा परिणाम झाला होता. त्यातूनही कारखान्यांनी गाळप जोमाने सुरू ठेवले. यंदाच्या हंगामात राज्यात ९५ सहकारी, तर ९७ खासगी कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला आहे. त्यांनी ५ कोटी ५६ लाख उसाचे गाळप करून ५ कोटी ४८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
सर्वाधिक गाळप सोलापूर विभागात झाले आहे. त्यातही सोलापूर जिल्ह्यात तब्बल १ कोटी ५ लाख टन गाळप झाले असून, उस्मानाबाद जिल्ह्यात २७ लाख २५ हजार टन झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ८७ लाख ५२ हजार टन तर सांगली जिल्ह्यात ४५ लाख २५ हजार टन गाळप झाले आहे. साखर उताऱ्यात नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागच पुढे राहिला आहे.
हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक म्हणजे १० लाख ५६ हजार टन गाळप करत असताना ११.३५ टक्के उतार कायम राखला आहे. त्यापाठोपाठ माढा (जि. सोलापूर) येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने १० लाख १७ टनांचे गाळप केले आहे.
विभागनिहाय गाळप टनात व उतारा टक्केवारी-
विभाग | कारखाने | गाळप | उतारा |
कोल्हापूर | ३५ | १.३२ कोटी | ११.१६ |
पुणे | २९ | १.१३ कोटी | १०.०२ |
सोलापूर | ४५ | १.३२ कोटी | ८.८९ |
अहमदनगर | २६ | ७४.९५ लाख | ९.३२ |
औरंगाबाद | २३ | ४३.४६ लाख | ९.२२ |
नांदेड | २७ | ५१.९७ लाख | ९.७९ |
अमरावती | ३ | ३.९९ लाख | ८.६० |
नागपूर | ४ | २.११ लाख | ८.३९ |