पावसाळ्यात कोसळणाऱ्या झाडांचे प्रमाण चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:23 AM2021-05-11T04:23:39+5:302021-05-11T04:23:39+5:30
अमर पाटील : कळंबा गत आठवड्यात झालेल्या वादळी मुसळधार पावसात रंकाळा तलाव, संभाजीनगर, रंकाळा खणविहार परिसर येथे महाकाय वृक्ष ...
अमर पाटील : कळंबा
गत आठवड्यात झालेल्या वादळी मुसळधार पावसात रंकाळा तलाव, संभाजीनगर, रंकाळा खणविहार परिसर येथे महाकाय वृक्ष उन्मळून पडले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही अथवा मोठे आर्थिक नुकसान झाले नाही. गतवर्षीही अंबाई तलावानजीक भर नागरी वस्तीत चार, साळोखेनगरात नागरी वस्तीत रिक्षावर, तर कळंबा-गारगोटी मार्गावर दोन महाकाय वृक्ष उन्मळून पडले होते.
बऱ्याचदा ही झाडे विजेच्या खांबांवर व तारांवर कोसळल्याने अघटित घटना घडण्याची शक्यता आहे.
धोकादायक वृक्षांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी छाटणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी असूनही बऱ्याचदा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. ही बाब नागरिकांच्या जिवावर बेतल्यावर प्रशासन जागे होणार काय? असा संतप्त सवाल आज होत आहे.
उपनगरांसह ग्रामीण भागात झाडांच्या मुळावर बांधकाम केले जाते. बऱ्याचदा झाडांच्या मुळावर पेव्हिंग ब्लॉक बसवले जातात. झाडालगत केबल टाकणे, रस्ते, गटारी, पदपथ विकसित करण्यासाठी खुदाई केली जाते. एकदा खुदाई केली की, पुन्हा पोकळ माती भरली जाते ज्यामुळे पावसाळ्यात पोकळी निर्माण होते. पावसाळ्यात मुळात पाणी असल्याने हवा जात नाही, परिणामी मुळे कुजून झाडे उन्मळून पडतात.
बऱ्याचदा पावसाळीपूर्व कामे करताना, शास्त्रोक्त पद्धतीने फांद्या न तोडता घाईगडबडीत कशाही फांद्या तोडल्या जातात, ज्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. राज्य शासनाच्या २००९ च्या नियमांन्वये वृक्ष प्राधिकरण समिती नेमत सार्वजनिक वनीकरण स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करून धोकादायक वृक्षांची छाटणी अपेक्षित असते. किमान यंदा तरी हे काम परिणामकारक व्हावे, ही मागणी जोर धरत आहे.
धोकादायक झाडांसाठी शासकीय नियमावली
२००९ च्या नियमांन्वये व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोकादायक व रस्ता रुंदीकरण करताना अडथळे ठरणारे वृक्ष काढण्यासाठी नियमावली करण्यात आली आहे. ज्यात संबंधित प्रशासनाने सर्वेक्षण करत एक झाड तोडल्यास पाच झाडे लावून संवर्धन करणे बंधनकारक आहे. धोकादायक झाडाखाली उभे राहू नये, यासाठी नोटीस व धोकादायक चिन्हे लावणे बंधनकारक आहे.