अनैतिक संबंधातून नूलमध्ये वडिलांचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 01:03 AM2018-11-20T01:03:20+5:302018-11-20T01:03:25+5:30
गडहिंग्लज / नूल : गावातील महिलेशी असलेले अनैतिक संबंध आणि घरात नेहमी भांडण करीत असल्याच्या कारणावरून बांबूच्या काठीने जबर ...
गडहिंग्लज / नूल : गावातील महिलेशी असलेले अनैतिक संबंध आणि घरात नेहमी भांडण करीत असल्याच्या कारणावरून बांबूच्या काठीने जबर मारहाण करून मुलाने वडिलांचा खून केला. आप्पासाहेब बाबू देसाई (वय ५८, रा. नूल, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा सोमगोंडा आप्पासाहेब देसाई (३०) आणि मेहुणा बाबासाहेब भीमगोंडा पाटील (४८, रा. मुगळी, ता. गडहिंग्लज) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत ग्रामस्थ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नूल येथील विठ्ठल मंदिरानजीक राहणाऱ्या आप्पासाहेब देसाई यांचे गावातीलच एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. त्या कारणावरून घरात वारंवार भांडण होत असे.
मृत आप्पासाहेब यांचा विवाहित मुलगा सोमगोंडा हा बेळगाव येथील एका खासगी कंपनीत नोकरीस असून, गर्भवती असलेली त्याची पत्नी माहेरी संकेश्वर येथे आहे. दोन दिवसांपूर्वीच आप्पासाहेब यांचे पत्नीबरोबर कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे त्या गडहिंग्लज येथील आपल्या विवाहित मुलीकडे राहायला आल्या होत्या.
दरम्यान, रविवारी (दि. १८) सायंकाळी सोमगोंडा गावी आला होता. त्यावेळी साडेसातच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात बाप-लेकांत भांडण झाले. त्यावेळी चिडलेल्या सोमगोंडाने गोठ्यातील बांबूच्या काठीने वडिलांच्या डोक्यात मारहाण केली. घाव वर्मी बसल्याने त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली. त्याने मुगळीहून मामा बाबासाहेब पाटील यांना बोलवून घेतले आणि दुचाकीवरून वडिलांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले.
उपजिल्हा रुग्णालयातील उपचारानंतर खासगी दवाखान्यात नेत असताना आप्पासाहेब याचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी मृतदेह गावी नूलला नेला. सोमवारी (दि. १९) सकाळी अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, उपनिरीक्षक विश्वास कुरणे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहासह आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस पाटील परशराम सरनाईक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे.
—————————
निनावी फोनमुळे खुनाचा उलगडा
सोमवार सकाळी अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच नूल येथे घडलेल्या प्रकाराची माहिती निनावी फोनमुळे पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी खाक्या दाखविताच आरोपींनी खुनाची कबुली दिली. त्यानंतर आरोपी, मृतदेह व तिरडीसह अंत्यसंस्काराचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले.
संशयिताकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
आपल्याकडून झालेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याचे माहीत असूनही हृदयविकाराने त्यांचे निधन झाल्याचे भासवत मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न सोमगोंडा याने केला. त्याला मामा बाबासाहेब याने मदत केली. त्यामुळे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.