नर्सरी बागेत शाही शिवजयंती सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 04:23 PM2019-02-19T16:23:11+5:302019-02-19T16:26:51+5:30
कोल्हापूर : लहरणारे भगवे झेंडे, शिवरायांचा पाळणा, शाहिरांची डफावरील थाप आणि ‘ छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष अशा ...
कोल्हापूर : लहरणारे भगवे झेंडे, शिवरायांचा पाळणा, शाहिरांची डफावरील थाप आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष अशा अभिमानी थाटात नर्सरी बागेत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मंदीरामध्ये बुधवारी शाही शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी मालोजीराजे व यौवराज यशराजराजे यांच्या हस्ते पुजन झाले.
सकाळी ९ वाजता भवानी मंडप येथून छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी शाही लवाजाम्यासह नर्सरी बागेकडे प्रस्थान झाली. सकाळी १० वाजून १० मिनिटांनी मालोजीराजे व यौवराज यशराजे यांच्या हस्ते हा शाही सोहळा पार पडला. चांदीच्या पाळण्यामध्ये ठेवलेल्या शिवप्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले.
यावेळी छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अॅड. आर. एल. चव्हाण, बंटी यादव, विक्रमसिंह यादव, अजितसिंह चव्हाण, प्रणिल इंगळे, प्रसन्न मोहिते, मुस्लीम बोर्डिंगचे गणी आजरेकर, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, संभाजीराव मांगोरे-पाटील,राजोपाध्ये दादर्णे यांच्यासह मानकरी उपस्थित होते. यावेळी आतषबाजी करण्यात आली. यावेळी पोवाडाही सादर करण्यात आला.
जिल्हा बॅँकेत शिवजयंती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मंगळवारी जिल्हा बॅँकेत साजरी करण्यात आली. बॅँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे व संचालक आसिफ फरास यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी मुख्यकार्यकार अधिकारी डॉ. ए. बी. माने, व्यवस्थापक जी. एम. शिंदे, रणवीर चव्हाण, विकास जगताप, आर. जे. पायील, अजित पाटील, ए. एल. साळोखे, डी. सी. जाधव यांच्यासह बॅँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे शिवजयंतीनिमित्त बुधवारी कसबा बावडा येथील पोलीस मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा, अपर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, उपअधीक्षक (गृह) सतीश माने, राजू शिंदे , आनंदा वरेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात
शिवाजी विद्यापीठात मंगळवारी शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त विद्यापीठाच्या प्रांगणात रांगोळी घालण्यात आली होती.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी झांजपथकासह विद्यापीठ परिसरात प्रभातफेरी काढली. विद्यार्थ्यांनी पन्हाळगडावरुन आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. शिवाजी महाराज यांच्या जयघोषासह लेझीम, ढोल-ताश्यांच्या गजरात विद्यापीठ परिसर दणाणून गेला.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ.डी.आर.मोरे, अधिष्ठाता डॉ.पी.एस.पाटील, डॉ.ए.एम.गुरव, डॉ.पी.डी.राऊत, इनोव्हेशन व इनक्युबेशन कक्षाचे संचालक डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.डी.के.गायकवाड, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.पी.टी.गायकवाड यांच्यासह विद्यार्थी, शिवप्रेमी उपस्थित होते.
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल
संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात मंगळवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका शिवानी देसाई आणि पर्यवेक्षक श्रीराम जाधव यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली.
विद्यार्र्थ्यानी यावेळी विविध कलागुणांची तसेच लाठी काठी, तलवारबाजी, पोवाडे ढोलवादन, गाणी, भाषणे आणि पोवाड्यांची प्रात्यक्षिके सादर केली. उर्वी उपळेकर आणि अर्पिता पुरोहित या विद्यार्थिनींनी शिवरायांचे चित्र साकारले. कार्यक्रमात जोया बागवान, रिचाली काशिद, सुशांत सुतार, गौरव कदम, मेघल मंडलिक, शलाका सुतार, शरयू सुतार, महेश जोगदांडे, आदी विद्यार्थ्यांनी भाग घेतला. शर्विल श्रीखंडे याने महाराजांचा पोवाडा जोशात सादर केला. सहशिक्षक युवराज मोळे यांनी यावेळी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन रविना चौधरी आणि उमर शेख या विद्यार्थ्यांनी केले.