ओबीसी नेते मराठा समाजाला वेगळे करू पाहतायत, मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आरोप
By पोपट केशव पवार | Published: October 7, 2023 06:53 PM2023-10-07T18:53:02+5:302023-10-07T19:00:09+5:30
सरकारची भूमिका दुटप्पी
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध करत ओबीसी नेते मराठा समाजाला बहुजन समाजातून वेगळे करू पाहत आहेत असा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला.
कोंढरे म्हणाले, भारतीय राज्यघटनेच्या आधारे निर्माण झालेला आरक्षण कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रा सहानी खटल्याच्या आधारे राज्य मागासवर्ग आयोगाच्या तरतुदीच्या आधारे आरक्षण धोरण राबविले जाते. या दोन्ही तरतुदीचा आधार न घेता ज्यांनी ओबीसीतील अतिरिक्त आरक्षण अगोदरच बेकायदेशीर व्यापले आहे त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणास व कुणबी प्रमाणपत्रास विरोध करणे ही भूमिका घटनाबाह्य आहे. ओबीसी नेत्यांनी आरक्षणाला विरोध करून मराठा समाजाला बहुजन वर्गातून वेगळे करू नये.
यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, विजयसिंह पाटील उपस्थित होते.
सरकारची भूमिका दुटप्पी
राज्य सरकार ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही असे ओबीसींना सांगते तर दुसरीकडे मराठा समाजालाही आरक्षण देणार असा शब्द देते. त्यामुळे सरकारची ही भूमिका दुटप्पी असल्याचे कोंढरे म्हणाले.