स्थूलपणाचा भारतीयांना धोका

By admin | Published: January 9, 2017 01:01 AM2017-01-09T01:01:50+5:302017-01-09T01:01:50+5:30

‘सीपीआर’मध्ये जनजागृती कार्यशाळा : लठ्ठपणात जागतिक पातळीवर तिसरा क्रमांक

Obese Indians Risk | स्थूलपणाचा भारतीयांना धोका

स्थूलपणाचा भारतीयांना धोका

Next

कोल्हापूर : स्थूलपणा व त्याचा शरीरावर होणाऱ्या गंभीर परिणामांमुळे जागतिक समस्या निर्माण झाली आहे. स्थूलपणामध्ये भारत सध्या जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. या आजारावर प्रत्येकाने जर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. तसे न झाल्यास तिसऱ्या क्रमांकावरून भारत पहिल्या क्रमांकावर जाण्यास फार उशीर लागणार नाही, असा चिंतेचा सूर स्थूलता जनजागृती कार्यशाळा उमटला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधवैद्यकशास्त्र विभागातर्फे रविवारी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) आॅडिटोरियम सभागृहात ही जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. टी. बोरसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी रामानंद यांनी, स्थूलपणाचे वाढते प्रमाण किती आणि कशा प्रकारे त्रासदायक आहे, याविषयी मार्गदर्शन केले.
स्थूलपणाचे प्रमाण मागील दोन दशकांमध्ये फक्त मोठ्या वयोगटात दिसत होते; परंतु सध्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध गटापर्यंत तसेच समाजातील सर्व प्रकारच्या गटांमध्ये स्थूलपणाचा आजार दिसून येतो. स्थूलपणा फक्त शरीरातील चरबीच्या प्रमाणाशी निगडित असून त्याच्यामुळे शरीरात वेगवेगळ्या अवयवांचे गुंतागुंतीचे आजार होत असतात.(उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, लकवा, इत्यादी), आदी मते विविध डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. मोहन राऊत यांनी, जगामध्ये व भारतामध्ये असलेल्या प्रमाणाविषयी; तर डॉ. अर्पणा कुलकर्णी यांनी, स्थूलपणामुळे विविध अवयवांवर होणाऱ्या बदलाविषयी मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी, लहान मुलांमध्ये होणाऱ्या स्थूलपणाविषयी सांगितले.
दुपारच्या सत्रात डॉ. मारुती पवार यांनी स्थूल व्यक्तींवर करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांवेळी तसेच भूल देताना घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. ए. एम. झेंडे, डॉ. अनिता परितेकर, डॉ. एम. व्ही. बनसोडे, डॉ. रश्मी पाटील, डॉ. राहुल बडे, डॉ. मानसिंग आडनाईक, आदींनी मार्गदर्शन केले. डॉ. सागर पाटील व डॉ. रेणू भरणे यांनी सूत्रसंचालन; तर डॉ. ए. के. वाईकर यांनी स्वागत केले. कार्यशाळेला डॉ. व्ही. ए. देशमुख, डॉ. सरवदे, डॉ. कारंडे, डॉ. सुदेश गंधम यांच्यासह ३५० हून अधिक डॉक्टर उपस्थित होते. डॉ. जी. व्ही. पाटील यांनी आभार मानले.

लठ्ठपणाला सध्याची जीवनशैली, तणावयुक्त जीवनमान, व्यायामाचा अभाव व सदोष आहार जबाबदार.
फक्त पोटाचा घेर वाढणे हेच स्थूलपणाचे लक्षण नसून वेगवेगळ्या अवयवांमध्ये होणाऱ्या गुंतागुंतीमुळे रुग्णाला विविध प्रकारचा त्रास होतो.
सांध्याचा व हाडांचा त्रास स्थूल व्यक्तींत जास्त दिसून येतो व वजन घटविल्यास तो कमी होऊ शकतो.

Web Title: Obese Indians Risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.