महाडिक, खवरे यांच्या अर्जावर आक्षेप
By Admin | Published: March 25, 2015 01:09 AM2015-03-25T01:09:51+5:302015-03-25T01:18:52+5:30
राजाराम कारखाना निवडणूक : तणावपूर्ण वातावरण; १६७ अर्ज पात्र, १८ अपात्र
कसबा बावडा : ‘राजाराम’ साखर कारखाना निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १८८ उमेदवारी अर्जांची आज, मंगळवारी छाननी झाली. यामध्ये १७६ अर्ज पात्र, १८ अर्ज अपात्र, तर आमदार महादेवराव महाडिक, शशिकांत खवरे, शिवाजी शामराव पाटील या तीन आक्षेप घेतलेल्या अर्जांचा निकाल राखीव ठेवला आहे. आज, बुधवारी याबाबत निर्णय देण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी सांगितले. दोन्ही गटाकडून अर्जांवर आक्षेप घेतल्याने छाननीच्या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण बनले होते.रमणमळा येथील बहुउद्देशीय इमारतीमधील कार्यालयात निवडणूक अधिकारी संजय पवार यांच्यासमोर सकाळी ११ वाजता प्राप्त १८८ अर्जांच्या छाननीला सुरुवात झाली. यामध्ये विविध कारणांनी १८ अर्ज अपात्र ठरले. संस्था गट व उत्पादक सभासद प्रतिनिधी गटातून आलेल्या आमदार महादेवराव महाडिक यांच्या अर्जावर कारखान्याचे माजी चेअरमन विश्वास नेजदार तसेच विद्यानंद जामदार यांनी आक्षेप घेतला. आमदार महाडिक हे कोल्हापूर अर्बन बँकेला एका कर्जदाराला जामीन आहेत आणि हे कर्ज थकले आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करावा, अशी मागणी केली. मात्र, सदरचे कर्ज भरले असल्याचे वकिलांकडून यावेळी महाडिक यांच्याकडून सांगण्यात आले. या हरकतीमुळे छाननी ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले.
शिरोलीच्या शशिकांत खवरे व शिवाजी पाटील यांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आला. कारखान्याला पाच वर्षांत तीनवेळा ऊस न घातल्याचा त्यांच्यावर आक्षेप आहे. याशिवाय अन्य विविध गटांतील काही उमेदवारांचे अर्ज विविध कारणांनी अवैध ठरविण्यात आले. मात्र, खवरे यांनी आपण उसाचा कारखान्याला करार केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)