जयंत आसगावकर यांच्या विद्यापीठातील सभेवर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 10:55 AM2020-11-19T10:55:37+5:302020-11-19T10:59:35+5:30
Pune, kolhapur, Education Sector, Teacher पुणे शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर हे प्रचारानिमित्त शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभागात गेले होते. यावेळी त्यांनी या विभागातच प्रचारसभा घेतल्याबद्दल काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यांनी याबाबत विचारणा करणारे पत्र हे विद्यापीठ प्रशासनाला पाठविले आहे.
कोल्हापूर : पुणेशिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर हे प्रचारानिमित्त शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभागात गेले होते. यावेळी त्यांनी या विभागातच प्रचारसभा घेतल्याबद्दल काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यांनी याबाबत विचारणा करणारे पत्र हे विद्यापीठ प्रशासनाला पाठविले आहे.
विद्यापीठ कॅम्पसवर कोणताही कार्यक्रम घेण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असते. त्यामुळे या सभेसाठी पूर्वपरवानगी घेतली होती का? निवडणुकीतील एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराची सभा कशी काय घेतली जाते? असे आक्षेप व्यवस्थापन परिषदेच्या संबंधित सदस्यांनी नोंदविले आहेत. गेल्या आठवड्यात विद्यापीठातील या अधिविभागात आसगावकर हे प्रचारासाठी आले होते. त्यासाठी या विभागातील काही प्राध्यापकांसह विभागप्रमुखदेखील उपस्थित होते.
अशा स्वरूपातील सभाही विद्यापीठाचे संकेत मोडणारी आहे. त्यामुळे त्याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. अशा स्वरूपातील प्रचारसभा झाली आहे का?, त्यासाठी पूर्वपरवानगी घेतली होती का?, आदींबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे विचारणा करण्याबाबतचे पत्र व्हॉटसॲपद्वारे पाठविले आहे. त्याबाबत प्रशासनाकडून माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, याबाबत रसायनशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. जी. एस. गोकावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शिक्षक मतदारसंघातील उमेदवार आसगावकर हे प्रचारानिमित्त अधिविभागातील प्राध्यापकांना भेटण्यासाठी आले होते. त्यांची प्रचारसभा अथवा मेळावा झालेला नाही.