कोल्हापूर वनवृत्तात ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट : क्लेमेंट बेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:58 AM2019-06-25T10:58:51+5:302019-06-25T11:00:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर वनवृत्तामध्ये यंदा ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर वनवृत्तामध्ये यंदा ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्या दृष्टीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तयारी झाल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांनी दिली.
शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती देण्यासाठी सोमवारी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ, विभागीय वनसंरक्षक सूर्यकांत काटकर आणि विभागीय वनअधिकारी दीपक खाडे उपस्थित होते.
बेन म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला १ कोटी १३ लाख २२ हजार, साताऱ्यासाठी १ कोटी २४ लाख १ हजार, सांगलीसाठी ७२ लाख ३० हजार, सिंधुदुर्गसाठी ४१ लाख ६६ हजार आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ४८ लाख ९३ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभागासोबतच सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायत आणि इतर शासकीय विभागांसह स्वयंसेवी संस्था यांच्याकडून हे उद्दिष्ट पूर्ण करून घेण्यात येणार आहे.
या सर्व जिल्ह्यांमध्ये खड्डे खुदाईची कामे पूर्ण झाली आहेत. याअंतर्गत या जिल्ह्यांमध्ये २३ ओढ्यांच्या दुतर्फा प्रायोगिक तत्त्वांवर ५० हजार बांबूची रोपे लावण्यात येणार आहेत. या कालावधीत ३० सप्टेंबरपर्यंत वनमहोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्याद्वारे रोपांची विक्री केली जाणार आहे.
उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला १ कोटी १३ लाख २२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, त्यासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाकडे १ कोटी २१ लाख ४७ हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ४ लाख ४० हजार हरित सेना सदस्यांची नोंदणी करावयाची असून, त्यापैकी ३ लाख ७२ हजार नोंद झाली आहे.
................................
नवे पारगाव येथे वृक्षारोपण आरंभ
शासनाचा १ जुलैचा वृक्षारोपण आरंभ हा पारगाव (ता. हातकणगंले) येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी येथे आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
.......................................
झाडे वाळलेली दिसली म्हणजे मेली असे नव्हे
गेल्या दोन वर्षांतील वृक्षलागवडीपैकी ७३ टक्के झाडे जगल्याचा दावा यावेळी करण्यात आला. क्लेमेंट बेन म्हणाले, सर्वच १०० टक्के झाडे जगली असा आमचा दावा नाही; परंतु झाडे वाळली म्हणजे ती लगेच मरत नाही. पावसाळ्यात पुन्हा ती जगतात.
................................
समीर