शिवडावच्या दफनभूमीत सरकारी त्रुटींचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:27+5:302021-07-07T04:28:27+5:30
कोल्हापूर : शिवडाव (ता. भुदरगड) येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठीच्या प्रस्तावात सरकारी त्रुटी व तेथील नागरिकांचा विरोध असल्याने त्याला अजून ...
कोल्हापूर : शिवडाव (ता. भुदरगड) येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठीच्या प्रस्तावात सरकारी त्रुटी व तेथील नागरिकांचा विरोध असल्याने त्याला अजून मंजुरी मिळालेली नाही. मात्र, ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने सोमवारी पुन्हा भुदरगड प्रांतांना या त्रुटींची पूर्तता करून अहवाल सादर करावा, असे पत्र पाठवण्यात आले आहे.
‘लोकमत’च्या रविवार (दि. ४ जुलै)च्या अंकात ‘शिवडावला दफनभूमी जागेसाठी मुस्लिम समाजाची धावाधाव’ हे वृत्त छापून आले होते. याची दखल घेत पुन्हा हे पत्र पाठवण्यात आले आहे. यापूर्वी कार्यालयाने गेल्यावर्षी २५ सप्टेंबरला हे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार दफनभूमीच्या प्रस्तावातील जागेचा पंचनामा व्यवस्थित केला गेलेला नाही. सातबारा उतारावरील एकूण जमीन, वाटप झालेली व उर्वरित जमिनीपैकी कोणत्या बाजूच्या जमिनीची मागणी करण्यात आली याची नोंद नाही. येथून महावितरण कंपनीची विद्युत वाहिनीदेखील गेली असून, त्याची पंचनाम्यात नोंद नाही. ज्या जमिनीची मागणी केली आहे, त्याच्या सीमा लाल रंगाने दाखवलेल्या नाहीत. भोवतालच्या लोकांना काही त्रास होणार आहे याचे जबाब नाहीत.
प्रस्तावित गटाच्या एकूण जमिनीपैकी ७.१९ हेक्टर आर जमिनीचे वाटप झाले असून, ०.८४.१२ आरक्षेत्र वाटपासाठी उपलब्ध आहे. या गटासाठी ग्रामपंचायतीतर्फे पाण्याची टाकी, ग्रामपंचायत कार्यालय, क्रीडांगण व दफनभूमी असे चार प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी अन्य तीन मागणींचे प्रस्ताव कोणत्या स्तरावर प्रलंबित आहेत याचा खुलासा नाही. त्यांच्या जागेची माहिती नकाशात दाखवण्यात आलेली नाही. शिवाय येथील धरणग्रस्त वसाहतीतील ५१ लोकांनी वसाहतीसाठी लागणाऱ्या नागरी सुविधांसाठी जमिनीची गरज असून, गट नंबर १०९ वर दफनभूमी मंजूर करू नये, अशी मागणी केली आहे. हे अर्ज निकाली निघालेत की नाही हे माहिती नाही. या सगळ्या त्रुटी शासकीय पातळीवरच्या असल्याने तरी मुस्लिम समाजाला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
---