‘नाईट लँडिंग’मधील अडथळे दूर करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:15+5:302021-03-13T04:42:15+5:30

कोल्हापूर : नियोजनबद्ध आणि अधिकारी, लोकप्रतिनिधींनी सामूहिकपणे प्रयत्न केल्यास कोल्हापूरच्या विमानसेवेला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या नाईट लँडिंगमधील अडथळे दूर ...

Obstacles to night landing can be overcome | ‘नाईट लँडिंग’मधील अडथळे दूर करणे शक्य

‘नाईट लँडिंग’मधील अडथळे दूर करणे शक्य

Next

कोल्हापूर : नियोजनबद्ध आणि अधिकारी, लोकप्रतिनिधींनी सामूहिकपणे प्रयत्न केल्यास कोल्हापूरच्या विमानसेवेला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या नाईट लँडिंगमधील अडथळे दूर करणे शक्य आहे. सध्या असलेली १३७० मीटरची धावपट्टी पहिल्या टप्प्यात १९०० मीटर झाल्यास केंद्र सरकारच्या उडान योजनेतील चौथ्या टप्प्यांतून काही नवीन मार्गावरील सेवा कोल्हापूरमधून सुरू होऊ शकतात.

या विमानतळाच्या विस्तारीकरणासह अन्य प्रलंबित प्रश्नांबाबत गेल्या दोन आठवड्यांपूर्वी कोल्हापूमध्ये खासदार संभाजीराजे यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी स्थानिक प्रश्न सोडविण्याबाबत विविध विभागांना सूचना करण्यात आल्या. ‘डीजीसीए’च्या पातळीवरील प्रश्न सोडविण्याकरिता दिल्लीमध्ये लवकरच बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार ‘डीजीसीए’चे प्रमुख अरुणकुमार यांच्यासमवेत चर्चा करण्यासाठी मंगळवारी (दि. १६) बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांना निमंत्रित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाईट लँडिंगसह विस्तारीकरणाच्या कामातील अन्य अडथळे आणि ते दूर करण्याबाबतच्या काही उपायांचा ‘लोकमत’ने आढावा घेतला.

या अडथळ्यांवर काय करता येईल?

१) फनेल एरियातील अडथळे : स्पष्टपणे दृश्यता (व्हिजीबिलिटी) येण्यासाठी विमानतळाच्या फनेल एरियामध्ये काही अडथळे आहेत. त्यात केआयटी कॉलेज, वैभव हौसिंग सोसायटी परिसरातील काही इमारतींचा भाग, पाण्याची टाकी यांचा समावेश आहे. नाईट लँडिंग सुविधेसाठी देखील हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. संबंधित परिसरातील नागरिकांशी चर्चा करून सामंजस्याने हे अडथळे दूर करता येतील.

२) हाय टेन्शन पॉवर लाईन : ही उच्चदाबाची विद्युतवाहिनी स्थलांतरित करण्याचा मुद्दा पुढे आला आहे. हे काम करण्यासाठी निधी उपलब्ध होण्यात अडचण असल्याचे दिसते. त्यावर या विद्युत वाहिनीच्या दुसऱ्या बाजूने विमानाचे टेक ऑफ, लँडिंग करण्याचा पर्याय आहे.

३) ऑल वेदर लाईट : नाईट लँडिंगसह सर्व ऋतूंमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी ऑल वेदर लाईट, अप्रोच लायटिंग आवश्यक आहे. या सुविधेसाठी धावपट्टी विस्तारीकरणाचे काम लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.

४) अतिरिक्त भूसंपादन : धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगीच्या बाजूकडील ३२ एकर अतिरिक्त भूसंपादन होणे गरजेचे आहे. ही भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाकडून गतीने व्हावी.

५) मोठी विमाने उतरण्यातील अडचण : एटीआर ७२, एम्ब्रररसारखी विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरण्यासाठी किमान १९०० मीटरची धावपट्टी असणे आवश्यक आहे. सध्या असलेली १३७० मीटरची धावपट्टी १९०० मीटरपर्यंत वाढविल्यास मोठी विमाने याठिकाणी उतरविता येतील. त्यामुळे उडान योजनेच्या चौथ्या टप्प्यात नव्या मार्गावरील सेवा कोल्हापूरमधून सुरू करता येईल.

अन्य सुविधा

जिल्ह्यात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती असल्याने कार्गो सेवा भविष्यात वाढणार आहे. ते लक्षात घेऊन त्यादृष्टीने सध्या विमानतळाच्या कार्यालयाची इमारत कार्गो सेवेच्या कार्यालयासाठी वापरण्यात यावी. विमानतळाकडे जाणारे अप्रोच रोडच्या चौपदरीकरणाबाबत प्राधिकरणाकडून, तर विमानतळ ते कोल्हापूर शहर अशी मिनी बससेवा (एसी सुविधेसह) पुरविण्याबाबत के.एम.टी.कडून विचार व्हावा.

प्रतिक्रिया

कोल्हापूरच्या विमानसेवेला गती देण्यासाठी नाईट लँडिंग सुविधा सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारा ‘डीजीसीए’चा परवाना मिळविण्याकरिता मंगळवारी होणाऱ्या बैठकीत आग्रह धरला जाणार आहे. कार्गो सेवा, विस्तारीकरणातील अन्य कामांबाबतही चर्चा केली जाईल.

- खासदार संभाजीराजे

विमानतळ विस्तारीकरणातील अडथळे पाहता, ते दूर करणे शक्य आहे. त्याबाबत या विस्तारीकरणाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री प्रयत्न करण्याऐवजी नियोजनबध्द कामाला प्राधान्य द्यावे. प्रत्येक काम पूर्णत्वाची मुदत निश्चित करावी.

- विज्ञानंद मुंढे, सदस्य, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

Web Title: Obstacles to night landing can be overcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.