नदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळा, इशाऱ्यानंतर हटवण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:35 PM2020-06-13T12:35:32+5:302020-06-13T12:43:10+5:30
राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या नदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळा येत आहे. पाटबंधारे विभागाकडून संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर हा भराव हटवण्याचे काम सुरू झाले.
रमेश पाटील
कसबा बावडा: राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या नदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळा येत आहे. हा भराव त्वरित हटवावा अशी मागणी पाटबंधारे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. तरीही ठेकेदार कंपनीने हा भराव काढण्याकडे दुर्लक्ष केले होते. शुक्रवारी या बाबत पाटबंधारे विभागाकडून संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर हा भराव हटवण्याचे काम सुरू झाले.
राजाराम बंधारा येथे गेल्या अडीच वर्षांपासून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी नदीपात्रात भर घालण्यात आली आहे. सध्या बंधाऱ्यातून खालील बाजूस पाणी सोडण्यात आले आहे. मात्र हे सोडलेले पाणी नदीपात्रात असल्याने भरीमुळे तटून पाण्याला फुगी येत आहे.
या सततच्या फुगीमुळे बंधाऱ्यातील काही मोरीच्या तळातील लोखंडी प्लेटा काढण्यात अडथळा येत आहे. तसेच पुराच्या वेळी पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन पुराचे पाणी शहरात घुसण्याची शक्यताही असल्याने हा भराव काढणे गरजेचे असल्याचे पाटबंधारे विभागाचे मत आहे. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी कळवले होते.
दरम्यान सध्या पाटबंधारे विभागाला राधानगरी,तुळशी आणि कुंभी या जलाशयामधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करावयाचा आहे. त्यासाठीही ही भर अडथळा ठरत आहे. ही भर काढून घ्या असे वारंवार सांगूनही संबंधित ठेकेदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केले होते.
आज याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. बांदिवडेकर, शाखा अभियंता प्रवीण पारकर यांनी दुपारी बाराच्या सुमारास प्रत्यक्ष राजाराम बंधारा येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना बंधाऱ्यातील भरावामुळे पाण्याला फुगी येत असल्याचे दिसून आले. त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या लोकांना याबाबत कडक शब्दात सूचना दिल्या. तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हे काम त्वरित न झाल्यास कारवाई करा अशा सूचना केल्या.
या आदेशानंतर ठेकेदार कंपनीने जेसीबी, डंपरच्या सहाय्याने हा भराव हटवण्याचे कामास सुरुवात केली. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होईल. पावसाळ्यानंतर पुलाचे काम जेव्हा परत सुरू होईल, तेव्हा ठेकेदार कंपनीला नदीपात्र पुन्हा भराव घालावा लागणार आहे.