अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा अध्यादेश प्राप्त
By admin | Published: June 25, 2017 12:58 AM2017-06-25T00:58:53+5:302017-06-25T00:58:53+5:30
दोन वर्षांत कामे पूर्ण करावी लागणार : मुख्यमंत्र्यांसमोरील सादरीकरणानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संपूर्ण देशभरात ख्याती असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसराच्या विकास आराखड्यातील सर्व शुक्लकाष्ठ आता दूर झाले असून, एक औपचारिकता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्याचे सादरीकरण झाल्यानंतर ६८ कोटी ७० लाख रुपयांच्या या आराखड्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात होईल. दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून त्याबाबतचा अध्यादेश निघाला असून, त्याची प्रत महानगरपालिकेच्या प्रशासनास प्राप्त झाली. पुढील दोन वर्षांत ही कामे पूर्ण करावयाची आहेत.
गेली अनेक वर्षे राज्यकर्त्यांची आश्वासने, अधिकाऱ्यांच्या तांत्रिक त्रुटी आणि समाजातून येणाऱ्या सूचना यांच्या अनिष्ट फेऱ्यांत अंबाबाई मंदिर परिसराचा विकास आराखडा अडकला होता. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस सरकारच्या काळात १० कोटींचा निधी मंजूर होऊनही तो खर्च झाला नाही. कामेच न झाल्याने निधी परत गेला होता. त्यानंतर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत, अनेक टप्पे ओलांडत या आराखड्यास उच्चाधिकार समितीची अंतिम मंजुरी मिळाली. बदललेले नियोजन आणि कामांनुसार हा आराखडा ६८ कोटी ७० लाख रुपये खर्चाचा आहे.
मुंबईत मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या उपस्थितीत दि. ९ जूनला झालेल्या बैठकीत आराखड्यास मंजुरी दिली गेली. त्या संदर्भातील इतिवृत्त आणि मंजुरीचा सरकारी अध्यादेश दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या प्रशासनास प्राप्त झाला.
लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर या आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे. अंतिम सादरीकरण ही केवळ औपचारिकता आहे. मलिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने आराखड्यास अंतिम मंजुरी दिल्यामुळे आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. हा ६८.७० कोटी रुपयांचा आराखडा पहिल्या टप्प्यातील कामांसाठी तयार केला गेला आहे. पुढील दोन वर्षांत पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यांतील कामे केली जाणार आहेत. अंतिम मंजुरी मिळाल्यामुळे तसेच त्याचा सरकारी अध्यादेश निघाल्यामुळे आता मंदिर परिसराच्या विकासकामांना गती मिळणार आहे.