प्रसंगी नव्या सत्ताधाऱ्यांविरोधातही लढू

By admin | Published: October 31, 2014 01:11 AM2014-10-31T01:11:55+5:302014-10-31T01:12:07+5:30

राजू शेट्टी : ऊसदरासाठी संघर्ष ही संघटनेची जबाबदारीच, पहिल्या उचलीची घोषणा उद्या करणार

On occasion, we have to fight against new leaders | प्रसंगी नव्या सत्ताधाऱ्यांविरोधातही लढू

प्रसंगी नव्या सत्ताधाऱ्यांविरोधातही लढू

Next

कोल्हापूर : स्वाभिमानी संघटना महायुतीचा घटक पक्ष असल्याने यंदाच्या हंगामात ऊसदरासाठी संघटना आंदोलन करणार की नाही, अशी शंका आमच्या काही मित्रांना वाटू लागली आहे; परंतु राजकारण हा काही आमचा धंदा नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे यासाठीच संघटनेची स्थापना झाली असून, प्रसंगी त्यासाठी नव्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढावे लागले तर त्यासाठीही आमची तयारी असल्याचे संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी आज, गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
संघटनेने आंदोलन केले की, आमची दिवाळी खराब केली म्हणायचे आणि आता मात्र संघटना आंदोलन करणार की गप्प बसणार? असा प्रश्न उपस्थित करून शंका व्यक्त करायची, असे सध्या सुरू आहे. त्यामुळे आमचीही स्थिती जरा गाढव विकायला निघालेल्या शेतकऱ्यांसारखी झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
साखर कारखानदारीशी आमचा लढा हा चांगला ऊसदर व तिच्यातील अपप्रवृत्ती दूर करण्यापुरताच मर्यादित आहे. सरसकट साखर उद्योगाविरोधात संघटना कधीच नव्हती व नाही. या उद्योगाला बरोबर घेऊनच त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले असून यापुढेही तसेच प्रयत्न केले जातील, असे शेट्टी यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘यंदाची पहिली उचल किती असेल याची घोषणा जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत करू. गेल्यावर्षी २६५० रुपयांचा तोडगा निघाला; परंतु तेवढी रक्कम मिळविण्यात आम्हांला अपयश आले; कारण कायद्याने एफआरपी एवढी रक्कम मिळविणे शक्य होते; परंतु त्यापुढील कारखानदारांशी तोडग्यातून ठरलेली रक्कम वसूल करता येणे शक्य होत नाही. यासाठी ऊसदर मंडळ हा पर्याय चांगला आहे. केंद्र शासनाने आता साखरेचा आयातकर वाढविल्याने देशाबाहेरून साखर येणार नाही हे स्पष्टच आहे; परंतु गेल्या काही वर्षांत हंगामाच्या तोंडावर साखरेचे दर पाडून शेतकऱ्याला ऊसदर मिळणार नाही, असा अनुभव येत आहे. किरकोळ बाजारात साखर ३६ रुपये किलो असताना कारखान्यांकडून मात्र ती २४०० रुपये क्विंटलने खरेदी केली जाते. म्हणजे ग्राहकांचे खिसे कापायचे आणि शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ नाही, असे हे षड्यंत्र आहे. त्यावर टाच आणावी यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासंदर्भात केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पास्वान यांची भेट घेतली आहे.
आपल्याच सहकाऱ्याकडून एक कोटी कसे मागेन...?
जो माणूस स्वत: लोकवर्गणी काढून निवडून आला, तो आपल्या सहकाऱ्याकडून निवडणूक लढविण्यासाठी एक कोटी रुपये कसा मागेल ? अशी विचारणा खासदार शेट्टी यांनी यावेळी केली. शिरोळ मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार व संघटनेचे कार्यकर्ते उल्हास पाटील यांनी निवडणूक प्रचारात असा आरोप केला होता. उल्हास पाटील यांना पहिल्यांदा उमेदवारी देतानाच पुढील निवडणुकीत तुम्हाला थांबावे लागेल, असे सांगितले होते; परंतु त्यांनी शब्द पाळला नाही व रात्रीत पक्ष बदलला, असे शेट्टी यांनी सांगितले.
मशागत आमची, पीक भाजपला
गेली पंधरा वर्षे दोन्ही काँग्रेसच्या सरकारविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातत्याने संघर्ष केला. त्यांच्याविरोधात वातावरण तयार करण्यात आम्ही यशस्वी झालो; परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र संघटनेच्या उमेदवारांना यश मिळाले नाही. ज्या सहा मतदारसंघात संघटनेच्या विरोधात शिवसेना विजयी झाली तिथे राष्ट्रवादीला एकदम कमी मते आहेत व ज्या पाच मतदारसंघात राष्ट्रवादी विजयी झाली तिथे शिवसेनेला अगदीच कमी मते आहेत. हे सहजासहजी घडलेले नाही. त्यामुळे संघटनेचा पराभव झाला. पराभव झाला तरी भाजपच्या मतांमध्ये आमच्या सर्वांमुळे (संघटना, रासप व आठवले गट) वाढ झाली आहे. मशागत आम्ही केली; परंतु पीक भाजपच्या हाताला लागले. त्यामुळे त्यातील थोडा वाटा संघटनेला देण्याचा शब्द आता भाजपने पाळावा, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: On occasion, we have to fight against new leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.