अवकाळीने ऊसतोड मजुरांचे हाल
By admin | Published: November 17, 2016 12:38 AM2016-11-17T00:38:05+5:302016-11-17T00:36:10+5:30
निवाऱ्यासाठी शाळा, मंदिरांचा आधार : संसारोपयोगी साहित्याचे नुकसान; रात्र जागून काढली
जयसिंगपूर/ दानोळी : मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसात दानोळी, कवठेसार, उदगाव, चिंचवाड, कुरुंदवाड, हेरवाड, तेरवाड, कोथळीसह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांत पाणी शिरले. या परिसरात काळी जमीन असल्याने ऊसतोड मजुरांना रात्रभर जागावे लागले.
मात्र, मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने शिरोळ तालुक्यातील ऊसतोड मजुरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊसतोड मजुरांच्या झोपडी परिसरात पावसाचे पाणी शिरून धान्याची पोती, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ऊसतोड मजुरांनी ट्रॅक्टरच्या खाली बसून रात्र घालविली. तसेच जवळपास असलेल्या शाळा, मंदिरांत निवाऱ्यासाठी आधार घेतला होता.
तुरंबे : राधानगरी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेली पिके, जनावरांची वैरण, गुऱ्हाळघरे आणि ऊसतोड मजुरांचे मोठे नुकसान झाले. रब्बी पिके आणि ऊसशेतीला हा पाऊस काहीसा दिलासा देणारा आहे. काही ठिकाणी वीज पडून झाडे उन्मळून पडली, तर वीज दाब वाढल्याने इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली.
राधानगरी तालुक्यात काल रात्री वीज-वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे काही लोकांचे नुकसान झाले, तर काही शेतकऱ्यांना पावसाचा फायदा झाला. अचानक आलेल्या या पावसाने साऱ्यांचीच तारांबळ उडाली.
परराज्यातून ऊस तोडणी आणि मजुरीसाठी आलेले मजूर झोपडी बांधून राहिलेले होते. अचानक झालेल्या वादळ-वाऱ्याच्या पावसाने झोपड्यांच्या वर घातलेले कागद उडाले. त्यांचे संसारोपयोगी साहित्य भिजल्याने नुकसान झाले.
सावरवाडी : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे हवेतील उष्मा कमी झाला. तुरळक स्वरूपात पडलेल्या पावसामुळे ऊसतोड मजुरांची तारांबळ उडाली.
गेल्या आठवड्यापासून हवेत उष्मा वाढलेला होता. थंडीचे प्रमाण कमी झाले. अवकाळी पावसामुळे गोवऱ्या, विटा बनविणाऱ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले. ऊस व इतर पिकांना हा पाऊस वरदान ठरला. गुऱ्हाळ व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली होती.
शिरगाव : राधानगरी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट झाली. अनेकांचे भात, नाचणा, भुईमूग शेंगा भिजून चिंब झाल्या, तर ऊसपीक पार कोलमडून पडले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सायंकाळी विजांच्या कडकडाटासह शिरगाव व परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अनेक ठिकाणी गाड्या घसरून किरकोळ अपघात घडले. या पावसाने ऊसपीक काही ठिकाणी पूर्णपणे कोलमडून पडले आहे. शासनाने ताबडतोब या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
झोपडीत पाणी
ऊसतोड मजुरांच्या झोपडी परिसरात पावसाचे पाणी शिरून धान्याची पोती, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. अनेकांनी ट्रॅक्टरच्या खाली बसून रात्र घालविली. तसेच जवळपास असलेल्या शाळा, मंदिरांत निवाऱ्यासाठी आधार घेतला.