शिरोळ नावाचा महासागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:02 AM2019-08-12T01:02:44+5:302019-08-12T01:02:48+5:30
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एरव्ही दत्तदर्शनासाठी नृसिंहवाडीला जाण्याची ओढ अनेकांना असते. वाडीची दोन-चार किलो वांगी ...
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एरव्ही दत्तदर्शनासाठी नृसिंहवाडीला जाण्याची ओढ अनेकांना असते. वाडीची दोन-चार किलो वांगी घेतल्याशिवाय आणि कुरुंदवाडच्या बासुंदीची चव चाखल्याशिवाय भाविक, पर्यटक इथून बाहेर पडतच नाहीत. त्याच नृसिंहवाडी, कुरुंदवाडसह २५ हून अधिक गावांना आता कृष्णा-पंचगंगेनं अशी काही मगरमिठी मारली आहे की ती सुटता सुटेनाशी झाली आहे. शेकडो किलोमीटर पाहावं तिकडं पाणीच पाणी. शिरोळ नावाचा समुद्रच निर्माण झाल्याजोगी ही परिस्थिती.
कोल्हापूरजवळच्या आंबेवाडी, चिखलीमधील परिस्थिती थोडी नियंत्रणात आली आहे, असे म्हणत असतानाच शिरोळ तालुक्यातील पुराचा पाण्याचा वेढा पडलेल्या गावांची संख्या वाढू लागली. म्हणूनच रविवारी दिवसभर शिरोळ तालुक्याचा दौरा केला तर महापुराने उडविलेली हजारो ग्रामस्थांची दैना पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात जोरात पाऊस कोसळू लागला. धरणे भरली, विसर्ग सुरू झाले. जुलै अखेरीला मात्र पुन्हा पूर येण्याची चिन्हे दिसू लागली आणि तो तसा आलाच. तो आला तो इतक्या धडाक्याने आला की अंगावरच्या कपड्यांनिशी अनेकांवर बाहेर पडण्याची वेळ आली.
गोठ्यातील जनावरं सोडायची की बांधूनच ठेवायची हेही कळेना.जेवढं काही हाताला लागेल ते घेऊन, पोराबाळांना घेऊन आलेल्या बोटीतून बाहेर पडण्यासाठी अनेकांची धांदल उडाली. ज्यांना आत्मविश्वास होता की २००५ चा महापूर आम्ही बघितलाय, त्यात काय होतंय, असं म्हणणाऱ्यांना मग व्हॉट्स अॅपवरून जिल्हा प्रशासनाला मेसेज पाठवायची वेळ आली.
तोपर्यंत पाणी वाढलं. घरं पाण्याखाली गेली. गावातील दोन-तीन मजली घरांचा आसरा घ्यावा लागला. जनावरेही टेरेसवर नेऊन बांधावी लागली. त्यांच्या धारा काढायलाही माणसं नाहीत, अशी अवस्था. ज्यांना शक्य होतं त्यांनी आपल्यासमवेत जनावरंही छावणीत आणली आणि आता प्रतीक्षा पाणीपातळी कमी होण्याची आहे. छावण्यांमध्ये जेवणाची सोय आहे. चहापाणी आहे. अनेकजणांचा मदतीचा हात आहे. मात्र प्रश्न आहे तो परत घरी गेल्यावरचा. नेमकं कुठून सुरुवात करायची, हे कळेनासं होणार आहे.