जकात नाका इमारत, हौद उद्ध्वस्त

By admin | Published: March 13, 2016 01:35 AM2016-03-13T01:35:56+5:302016-03-13T01:37:05+5:30

पर्यायी शिवाजी पुलाचे आंदोलन : हद्दवाढ कृती समिती आक्रमक; प्रचंड गोंधळ, तणाव; अधिकाऱ्यांना घेराव

Octroi naka building, dismantling the ground | जकात नाका इमारत, हौद उद्ध्वस्त

जकात नाका इमारत, हौद उद्ध्वस्त

Next

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामात अडथळा ठरणारी जकात नाक्याची जुनी इमारत आणि पुरातन समजला जाणारा पाण्याचा हौद शनिवारी सकाळी जेसीबी यंत्रामार्फत उद्ध्वस्त करण्यात आला. विशेष म्हणजे, शासकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीने कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ही धाडसाची कारवाई केली; पण झाडे तोडण्याबाबत कायदेशीर अडचणी आणल्याने संतप्त झालेल्या कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करीत शिवाजी पुलावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको करून निदर्शने केली. सुमारे तीन तास हा गोंधळ सुरू होता.
दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच झाडे तोडण्यात कायदेशीर अडचणी आल्याने हे आंदोलन तूर्त स्थगित केले. उद्या, सोमवारी वृक्ष प्राधिकरण समितीची तातडीची बैठक घेऊन त्यामध्ये पुलाच्या बांधकामात अडथळा आणणारी झाडे तोडण्याबाबत रीतसर परवानगी देऊ, असे आश्वासन महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता अभय आवटे यांनी दिले; पण उद्या, सोमवारी झाडे तोडण्याबाबत निर्णय न घेतल्यास मंगळवारी आम्हीच झाडे तोडू, असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
शिवाजी पुलाला केलेल्या पर्यायी पुलाचे काम तातडीने सुरू करावे यासाठी शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अभय आवटे यांची भेट घेतली. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून प्रकल्पात अडथळा ठरणारा जकात नाका, पाण्याचा हौद आणि झाडे काढण्याचा निर्णय कृती समितीने घेतला. यावेळी फक्त जकात नाक्याची इमारत काढण्याच्या परवान्याबाबतचे पत्र आवटे यांनी कृती समितीला दिले.
नियोजनानुसार जकात नाक्याची इमारत हटविण्यासाठी शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक शिवाजी पुलानजीक एकत्र आले. सव्वाअकरा वाजता जेसीबी यंत्राद्वारे जकात नाक्याची इमारत पाडण्यास प्रारंभ केला.
अवघ्या अर्ध्या तासात ही इमारत उद्ध्वस्त केली. त्यानंतर आंदोलकांनी पाण्याचा हौद पाडण्यासाठी आग्रह धरला; पण उपस्थित अधिकाऱ्यांनी पुरातत्त्व विभागाचा तोंडी दाखला देत हौद पाडण्यास विरोध दर्शविला. संतप्त नागरिकांनी लोखंडी पहारीने हौद फोडला. त्यानंतर जेसीबी यंत्राद्वारे हौदाचे बांधकाम पाडले. हौदाचे दगडी बांधकाम पाडताना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत कारवाईच्या आडवे आले.
हौद पुरातत्त्व असल्याचे सांगत पर्यायी जागेत त्याचसारखा दुसरा हौद बांधताना जुन्या हौदाच्या प्रत्येक दगडावर नंबरिंग करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तासभराच्या चर्चेनंतर हौदाचे दगडी बांधकाम महापालिकेमार्फत काढून घेऊ, तसेच पुलाच्या ठेकेदारामार्फत पर्यायी हौद बांधून घेऊ, या निर्णयानंतर हौदाचे दगडी बांधकाम पाडण्याची कारवाई थांबली.
आंदोलनात नेते, नगरसेवक, कार्यकर्ते
आंदोलनात महापौर रामाणे, उपमहापौर मुल्ला, स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, भाजपचे महेश जाधव, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, नगरसेवक विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, राहुल चव्हाण, अफजल पीरजादे, शिवसेनेचे शहराध्यक्ष शिवाजी जाधव, राजू लाटकर, रमेश पुरेकर, विक्रम जरग, सुरेश जरग, अशोक पोवार, नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, लाला गायकवाड, वसंतराव मुळीक, चंद्रकांत यादव, ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई, शिवाजी शिंदे, राजू माने, राजू मोरे, अजित सासने, श्रीकांत भोसले, चंद्रकांत भोसले, दीपा पाटील, वैशाली महाडिक, चारूलता चव्हाण, जहिदा मुुजावर, शीतल तिवडे, आदी आजी-माजी नगरसेवक सहभागी झाले होते.
शिवाजी पुलावर ‘रास्ता रोको’
झाडे तोडण्याबाबत संबंधित अधिकारी विसंगत माहिती देत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी शिवाजी पुलावर रास्ता रोको करून वाहतूक रोखली. आंदोलनात महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक, कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार यांच्यासह आंदोलक सहभागी झाले. आंदोलकांनी नेत्रदीप सरनोबत, अभय आवटे, आर. के. बामणे या तिघा अधिकाऱ्यांना रास्ता रोको आंदोलनस्थळी जबरदस्तीने बसविले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अधिकाऱ्यांना धक्काबुक्की
आंदोलनस्थळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपअधीक्षक अभय आवटे, कार्यकारी अभियंता आर. के. बामणे हे आले. त्यांनी झाडे तोडण्यात कायदेशीर अडचणी असल्याबाबत सांगितले. त्यावेळी आंदोलक अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले, धक्काबुक्की केली. अधिकाऱ्यांनी परवान्याबाबत विसंगत माहिती दिल्यानंतर आंदोलकांनी, ‘तुम्हाला सोडणार नाही’ म्हणत घेराव घालीत त्यांना धक्काबुक्की करीतच रास्ता रोको आंदोलनात सहभागी करून घेतले.
मी जातो, झाडे तोडा...
झाडे तोडताना उपअधीक्षक अभय आवटे यांनी विरोध दर्शविला. महापालिकेने परवानगी दिली नसल्याचे सांगितले. त्यावेळी आंदोलक संतप्त झाले. त्यांनी नेत्रदीप सरनोबत आणि आर. के. बामणे यांना फोन करून बोलावले. परवानगी नसेल तरीही झाडे तोडणारच, असा पवित्रा घेतल्यानंतर ‘मी जातो, मगच झाडे तोडा’, अशी भूमिका आवटे यांनी घेतली; पण आंदोलकांनी त्यांना सोडले नाही. सरनोबत, बामणे हे दोघे आल्यानंतर तिघांनाही घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला.
स्थानिक नगरसेवकांचा विरोध : परिसराचे नगरसेवक अफजल पीरजादे यांनी, हौद पाडण्यास प्रथम विरोध केला. परिसरातील लोकांची सोय असल्याचे त्यांनी सांगितले; पण लोकांना महापालिकेच्या खर्चाने नळजोडणी द्यावी, अशी कृती समितीने भूमिका घेत हौदाचे वाढीव बांधकाम पाडले; पण नंतर झाडे तोडताना कायदेशीर अडचणी आल्याने काम थांबविले. त्यावेळी पीरजादे यांनी, हौद पाडला तर झाडेही तोडावीत, अशी भूमिका घेऊन कृती समितीच्या नेत्यांशी वाद घातला.
प्रचंड बंदोबस्त, अधिकारी गायब
आंदोलनस्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता; पण याचे गांभीर्य पोलिस अधिकाऱ्यांना नसावे; कारण आंदोलनस्थळाकडे एकही पोलिस अधिकारी फिरकले नाहीत. (प्रतिनिधी)

Web Title: Octroi naka building, dismantling the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.