सामान्यांच्या मनात मंडलिकांचे अढळ स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:33 AM2018-10-08T00:33:42+5:302018-10-08T00:33:47+5:30
म्हाकवे : महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात हिमालयाची उंची गाठलेले यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्यानंतर स्वत:च्या कर्तबगारीने हिमालयाची उंची गाठणारे भारदस्त सदाशिवराव मंडलिक हे चौथे व्यक्तिमत्त्व. ना आर्थिक पाठबळ...ना राजकीय वारसा तरीही शेतकरी, श्रमिक, शोषित, वंचित अशा सर्वसामान्यांचे नेतृत्व करत राजकीय पटलावर अढळ स्थान निर्माण करून त्यांनी कोल्हापूरचा बाणेदार ठसा उमटविला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी केले.
हमिदवाडा (ता. कागल) येथील मंडलिक कारखाना कार्यस्थळावर लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा को. आॅप. बँकेचे माजी अध्यक्ष पी. बी. पवार होते. यावेळी युवा नेते वीरेंद्र मंडलिक, उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले, संचालिका राजश्री चौगुले, जि. प. सदस्या शिवानी भोसले, पंचायत समिती सभापती विजय भोसले, प्रकाश पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, दिवंगत मंडलिक हे निर्णय घेण्यापूर्वी विश्वासू व्यक्तींसह कार्यकर्त्यांना विचारूनच निर्णय घेत. मात्र, एकदा घेतलेला निर्णय कोणतीही शक्ती समोर आली तरी ते बदलायचे नाहीत. त्यांच्याकडे अंगभूत चांगुलपणा, आक्रमकता, संघर्ष करण्याची तयारी होती.
प्रा. मंडलिक म्हणाले, सध्या उसासाठी मोठी स्पर्धा आहे. मात्र, आपल्या कारखान्याने यापूर्वीही चांगला दर दिला आहे. तीच परंपरा पुढेही कायम राहील.
स्वागत जीवन साळुंखे यांनी केले. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, के.डी.सी.सी. बँकेचे संचालक भय्या माने, कृष्णात पाटील, धैर्यशील पाटील- कौलवकर, व्ही. बी. पाटील, अनिल घाटगे, नंदकुमार सूर्यवंशी-पनोरीकर, मारुती काळुगडे, ईगल प्रभावळकर, मसू पाटील, चंद्रकांत गवळी, राजेखान जमादार, मधुकर सुतार उपस्थित होते.
‘लोकमत’च्या संपादकीय लेखाचे कौतुक
सदाशिवराव मंडलिक यांच्यासारखं दूरदृष्टी असणारे नेतृत्व जिल्ह्याने तीन वर्षांपूर्वी गमाविले. त्यांची आज जयंती साजरी होत असताना राजकीय, सामाजिक, कृषी क्षेत्रातील उणिवा आणि अपेक्षा यावर ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी ‘राजकीय खुजेपणातून कोल्हापूर कधी बाहेर पडणार ?’ या लेखात परखड मत मांडले आहे. त्याचा संदर्भ घेत मंडलिक हे परिपूर्ण राजकीय नेतृत्व होते. त्यामुळे तेच जिल्ह्यातील एकमेव मोठे राजकीय नेता झाल्याचे
डॉ. पाटील यांनी सांगताच उपस्थितांनी त्याला जोरदार टाळ्यांनी दाद दिली.
...म्हणून शाहू पुतळ्याला पुष्पहार
मंडलिक हे विद्यार्थीदशेपासूनच संघटन कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. विद्यार्थीदशेत त्यांनी अटीतटीने झालेल्या राजाराम कॉलेजच्या निवडणुकीत यश मिळविल्यानंतर मिरवणूक काढत छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. यातून शोषित, पीडित समाजाला आपला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपण सज्ज झालो आहे. याचे संकेत देण्यासाठीच त्यांनी हा पुष्पहार घातल्याची आठवण पी. बी. पवार यांनी सांगितली.