बेकायदा सावकारांवर आता गुन्हे
By admin | Published: April 2, 2016 12:31 AM2016-04-02T00:31:50+5:302016-04-02T00:40:25+5:30
अमोल पवार प्रकरण : उपनिबंधक ांसोबत पोलिसांची बैठक; संयुक्त कारवाईचा निर्णय
कोल्हापूर : स्वत:च्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी सेंट्रिंग कामगाराचा खून करणारा बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याला दहा ते तीस टक्के व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या ‘त्या’ खासगी सावकारांविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते व जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांची गुरुवारी (दि. ३१) बैठक झाली. त्यावेळी महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार सावकारांविरोधात येत्या आठ दिवसांत संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय झाला.
आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आय-२० कारसह जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उकलून या प्रकरणी कटाचा सूत्रधार असलेला अमोल व त्याचा भाऊ विनायक पवार या दोघांना अटक केली. त्यांनी सावकारांनी वसुलीसाठी लावलेल्या तगाद्यामुळे मृत्यूचा बनाव केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित खासगी सावकार रमेश लिंबाजी टोणपे, प्रकाश रमेश टोणपे, सतीश गणपतराव सूर्यवंशी, दत्ता नारायण बामणे, स्वरूप किरण मांगले, अशोक बाबूराव तनवाणी, प्रफु ल्ल अण्णासो शिराळे, सूरज हणमंत साखरे, नीलेश जयसिंगराव जाधव, पांडुरंग अण्णासो पाटील, रणजित अशोक चव्हाण, बिपीन ओमकारलाल परमार, अण्णा खोत, जयसिंगराव जाधव, प्रशांत सावंत (बेळगाव), आदी सावकारांकडे कसून चौकशी सुरू केली आहे.
अमोल पवार याने सावकारांविरोधात तक्रार देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा चेंडू जिल्हा उपनिबंधकांच्या कोर्टात टाकला. या कारवाईसंदर्भात पोलिस निरीक्षक मोहिते व जिल्हा उपनिबंधक काकडे यांची बैठक झाली. यापूर्वी मुंबई सावकारी अॅक्टनुसार कारवाई होत होती. या कायद्यामध्ये बदल होऊन दि. १६ जानेवारी २०१४ पासून नव्याने महाराष्ट्र सावकारी कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार दोषी सावकारांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस व जिल्हा उपनिबंधकांनी तयारी सुरू केली आहे.
दीड कोटीच्या बंगल्याचा ताबा
अमोल पवार याच्याकडे मॅनेजर म्हणून नोकरीस असलेला नीलेश जाधव याने वडिलांकडून पवार याला ६० लाखांचे कर्ज दिले आहे. त्याबदल्यात त्याने पवारच्या अपराध कॉलनी, सानेगुरुजी वसाहत येथील सुमारे दीड कोटी किमतीचा बंगल्याचा ताबा घेतला आहे. पवार याच्याकडे वसुलीसाठी कोण सावकार येत होते, त्याची माहिती शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी नीलेश जाधव याच्याकडून घेतली. त्याचबरोबर सराईत गुन्हेगार सूरज साखरेने आठ लाख रुपये पवारला दिले आहेत. या व्यवहाराबाबत दोघांच्यामध्ये कुठेही कागद झाला नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
पोलिस रेकॉर्डवर आलेल्या एकाही सावकाराचा परवाना नाही. सर्व बेकायदेशीर सावकारी करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. कायद्याचा अभ्यास करून दोषी सावकारांवर कारवाई केली जाईल.
- अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक
सावकारांवर गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांशी बैठक झाली आहे. नवीन कायद्यानुसार कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. येत्या आठ दिवसांत सावकारांवर कारवाई केली जाईल.
- दिनकर मोहिते, पोलिस निरीक्षक