आॅनलाईन औषधविक्री करणाऱ्या ‘अॅग्रो’ कंपनीवर गुन्हा : सदाभाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 06:09 PM2017-10-13T18:09:09+5:302017-10-13T18:13:15+5:30
राज्यात बेकायदेशीररीत्या अनेक औषध कंपन्या कीटकनाशकांची राजरोस विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश विभागीय कृषी सहसंचालकांना दिल्याची माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : राज्यात बेकायदेशीररीत्या अनेक औषध कंपन्या कीटकनाशकांची राजरोस विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिल्ली येथील अॅग्रो कंपनी टोल फ्री नंबर देऊन कीटकनाशकांचे आॅनलाईन बुकिंग करीत आहे. त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश विभागीय कृषी सहसंचालकांना दिल्याची माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. स्वत:च्या गाडीत औषधे टाकून शेतीचे डॉक्टर गावोगावी फिरत असून, अशांवरही लवकरच कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री खोत यांच्या अध्यक्षतेखाली निविष्ठा व गुणनियंत्रण आढावा बैठक शुक्रवारी ‘आत्मा’ कार्यालयात झाली. यावेळी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खोत म्हणाले, यवतमाळ येथील विषबाधेची झालेली घटना दुर्दैवी असून तेथील शेतकऱ्यानी कोणती औषधे वापरली, फवारणीसाठी कोणते पंप वापरले यांची माहिती घेऊन संबंधित कंपन्यांवर कारवाई केली आहे. जादा फवारा देणारे पंप बाजारात आले असून त्यावर बंदी घातली जाईल. कर्नाटकातून ‘डीआयओ-३०३’ हे कीटकनाशक विक्रीसाठी येत असून, या कंपनीवरही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
आढावा बैठकीत विभागातील ३७५८ बियाणे दुकानांपैकी २९४९ दुकानांची तपासणी करून १५०९ दुकानांतील बियाण्यांचे नमुने घेतले. त्यांपैकी १० नमुने अप्रमाणित आढळले आहेत. खत व औषधे दुकानांचीही तपासणी केली असून त्यामध्ये अनुक्रमे १५४ व ७ अप्रमाणित नमुने आढळले आहेत. विभागीय कृषी सहसंचालक महावीर जंगटे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी उमेश पाटील, बसवराज मास्तोळी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, आदी उपस्थित होते.
कर्जमाफीचे पैसे आठवड्यात
बॅँकांकडून माहिती येण्यास विलंब होत आहे. ज्या बॅँकांची माहिती येईल, त्या शेतकºयांना तातडीने पैसे दिले जातील. येत्या आठवड्यात शेतकºयांच्या खात्यावर पैसे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे खोत यांनी सांगितले.
धाडीसाठी पथके तयार
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, गुणनियंत्रक यांचे पथक, जिल्हा अधीक्षक कार्यालयांतर्गत तालुका कृषी अधिकाºयांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. विभागीय सहनिबंधकांना सोबत घेऊन काही ठिकाणी आपण कंपन्या व दुकानांवर धाडी टाकणार, त्याबरोबर शेतकºयांच्या भेटी घेणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
मान्यताप्राप्त औषधेच विक्री करा
कृषी विभागाने दिलेल्या परवान्यांत ज्या औषधांच्या विक्रीस परवानगी दिली आहे, त्याच औषधांची विक्री करावी. ती सोडून अथवा बंदी असणाºया औषधांची विक्री केली तर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे खोत यांनी सांगितले.