आक्षेपार्ह पोस्टमुळे तुरंबेत तणाव, एकास अटक; गावात मोठा पोलिस बंदोबस्त, कोल्हापुरात वाढले प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 01:30 PM2023-03-25T13:30:28+5:302023-03-25T13:50:47+5:30
संबंधित तरुणाच्या ग़ैरकृत्याबद्दल येथील मुस्लिम समाजाने निषेध नोंदवला
तुरंबे : प्रसारमाध्यमाच्या गैरवापरामुळे तरुणपिढी धोक्यात आल्याच्या घटना ताज्या असतानाच शुक्रवारी अशीच घटना राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे घडली. येथील एका तरुणाने दोघात झालेल्या संभाषणात महापुरुषांबद्दल वादग्रस्त चॅटिंग केल्याची माहिती उघडकीस आली. याबद्दल सिद्दीक इम्रान बागवान रा. तुरंबे (ता.राधानगरी) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी सकाळी कोल्हापुरात अटक केली. त्याच्यावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करून जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
दोन तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे दोन जातीमध्ये तेढ निर्माण झाल्याने तुरंबे (ता. राधानगरी) येथे ऐन यात्रेच्या दिवशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थ, पैपाहुणे भयभीत झाले. सर्व गावात जमलेल्या तरुणांच्या जमावाने घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दुपारी थोर महापुरुषांच्या संदर्भात वादग्रस्त असलेला व्हायरल मेसेज गावातील तरुणाच्या व्हाॅट्सअॅपवर आल्याने हळूहळू ही बातमी गावभर पसरली.
तरुण एकत्र जमले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देत तरुणांनी गावातील गल्लीगल्लीतून मोर्चा काढला. प्रार्थनास्थळावरील स्पीकर उतरवला. तेथून गावच्या मुख्य छत्रपती शिवाजी चौकात गेल्यावर घोषणाबाजी केली. त्यानंतर राधानगरी पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी संबंधित तरुणावर गुन्हा नोंद झाला असून शांततेचे आवाहन करत गावची यात्रा सुरळीत पार पाडा अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर जमाव पांगवला. घटनेमुळे गावातील चौकाचौकांत पोलिस छावणीचे रूप आले.
मुस्लिम समाजातर्फे घटनेचा निषेध
तुरंबे येथे हिंदू-मुस्लिम समाजात सलोखा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर करून दोन समाजात द्वेष निर्माण केल्याबद्दलच्या घटनेमुळे संबंधित तरुणाच्या ग़ैरकृत्याबद्दल येथील मुस्लिम समाजाने निषेध नोंदवला. यावेळी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
अल्पवयीन तरुणास अटक करण्यात आली आहे. तुरंबे सलोखा राखणारे गाव आहे. गावात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. वाद होणारे स्टेटस, बॅनर कोणी लावू नये. गावात पूर्ववत शांतता निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. - मंगेश चव्हाण, उपअधीक्षक कोल्हापूर शहर