'द केरळ स्टोरी' सिनेमावरुन आक्षेपार्ह पोस्ट, कोल्हापुरातील आजऱ्यात तणाव, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 12:57 PM2023-05-11T12:57:53+5:302023-05-11T13:05:02+5:30
शांतता कमिटीच्या बैठकीनंतर पुकारलेला बंद मागे
सदाशिव मोरे
आजरा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व मजकूर टाकल्यामुळे आजऱ्यात काल, बुधवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास जातीय तणाव निर्माण झाला होता. याच्या निषेधार्थ आज आजरा बंद पुकारण्यात आला होता. याप्रकरणी रात्रीच आजरा पोलिसांनी अथर्व रोडे या तरुणाला अटक केली आहे. दरम्यान, आज, सकाळी तहसिल कार्यालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पुकारलेला आजरा बंदचा निर्णय मागे घेण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर आजरा शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बारावीचे शिक्षण घेणाऱ्या अथर्व रोडे या तरुणाने 'द केरळ स्टोरी' या सिनेमावर आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर फोटो मजकूर टाकला. त्यामुळे एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावून समाजामध्ये तेढ निर्माण झाला. याच्या निषेधार्थ रात्री आजऱ्यात तणावपूर्ण शांतता होती. रात्री पोलीस स्टेशन समोर हुल्लडबाजी करीत काही तरुणांनी अथर्व रोडे या तरुणाला तातडीने अटक करा अशी मागणी केली तर आज आजरा बंदचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, आज सकाळी आजरा तहसिल कार्यालयात शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी अक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या अथर्व रोडे या तरुणाला अटक केली आहे. त्यामुळे बंद शांततेत पार पडावा असे आवाहन केले. तर यापुढे असे निंदनीय प्रकार घडू नयेत यासाठी सर्व धर्मीयांनी प्रयत्न करावेत असे आवाहन तहसिलदार समीर माने यांनी केले.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व सोशल मीडियाचा वापर कटाक्षाने करावा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी केले. यावेळी दिवाकर नलवडे, मंजूर मुजावर, अबुसईद माणगावकर, आनंदा कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले व आजरा बंद मागे घेत असल्याची घोषणा केली.
बैठकीला नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी,निवासी नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई, मुख्याधिकारी सुरेश सुर्वे, प्रशासन अधिकारी राकेश चौगुले, यासह शांतता कमिटी, सर्वपक्षीय, सर्वधर्मीय सदस्य उपस्थित होते.