Kolhapur Crime: आक्षेपार्ह स्टेटस; पोलिसात तक्रार देणाऱ्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 07:08 PM2023-03-18T19:08:04+5:302023-03-18T19:09:35+5:30
जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना देण्यात आले
संदीप बावचे
शिरोळ : दोन दिवसापूर्वी शिरोळ येथे थोर महापुरुषांच्या बद्दल आक्षपार्ह स्टेटस ठेवून महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रकार घडला. त्याबद्दल ज्या तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्याच्यावर चाकूने खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेच्या निषेधार्थ शिरोळ येथे आज, शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, खुनी हल्याप्रकरणी निहाल शफिक शेख (वय १९, रा.बेघर वसाहत शिरोळ) याला जयसिंगपूर न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
गुरुवारी (दि.१६) निहाल शेख याने थोर पुरुष यांच्याविषयी मोबाइल व्हाँट्सपवर आक्षपार्ह स्टेटस ठेऊन महापुरुषांचा अवमान करुन वेगवेगळ्या धार्मिक समाजात द्वेषाची भावना व जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य केले होते. याबाबत शेख याचे विरोधात पोलिसांत स्वानंद सहदेव पाटील (२०, रा.संभाजीपूर) याने तक्रार दाखल केली होती. त्याचा राग मनात धरून शुक्रवारी (दि.१७) रात्री शिरोळ-उदगांव मार्गावरील केपीटी जवळ काही समाजकंटकांनी स्वानंदवर चाकू हल्ला करून जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच शिरोळमधील हिंदुत्ववादी संघटना व तरुण कार्यकत्यांनी सुरुवातीला संशयिताच्या घरावर चाल केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानतर पोलिस ठाण्यासमोर जमाव एकत्र आला. याठिकाणी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी शिरोळ शहर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
मोटरसायकल रॅली काढून भ्याड हल्ल्याच्या निषेध नोंदवला. पंचायत समिती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तरुण कार्यकर्ते येथील छत्रपती शिवाजी तख्त येथे एकत्रित आले. त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, पृथ्वीराजसिंह यादव बजरंग काळे यांनी मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध नोंदवला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख मार्गावर पोलीस संचलन करण्यात आले.
दरम्यान, थोर पुरुषांचा अवमान करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी , अशा मागणीचे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना देण्यात आले.यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सिकंदर बागसार, मज्जिद आत्तार, शहाजहान शेख यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.