Kolhapur News: आक्षेपार्ह स्टेटस; वडगाव, मिणचे, सावर्डे येथे तणाव, दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 04:47 PM2023-03-18T16:47:43+5:302023-03-18T17:26:02+5:30
गोडाऊन, ट्रक पेटवला
पेठवडगाव : आक्षेपार्ह स्टेट्स ठेवून समाजाच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून शुक्रवारी सावर्डे, मिणचे, वडगाव येथे तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांविरोधात देशद्रोही कलमे लावून कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली. यासाठी सावर्डे ते वडगाव पोलिस ठाणे अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. यामुळे वडगाव, मिणचे, सावर्डेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सावर्डे (ता. हातकणंगले) येथील महंमद युनूस मोमीन या तरुणाने औरंगाबाद नामांतर व औरंगजेबच्या समर्थनाचा व्हिडीओ स्टेटसला ठेवला होता. यावरून सावर्डे परिसरातील संतप्त तरुणांनी गुरुवारी तरुणाच्या घराकडे धाव घेत तरुणाच्या वडिलास मारहाण केली. तसेच पोस्ट करणाऱ्या तरुणाविषयी विचारणा केली. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याच्या घराच्या काचा व गाडी काही तरुणांनी फोडली. तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी पालिका चौकात निषेध सभा घेतली.
सावर्डेतील घटना ताजी असताना मिणचे (ता. हातकणंगले) येथील फैयाज सौदागर नावाच्या मुलाने तसाच स्टेटस ठेवला. यामुळे शुक्रवारी वातावरण पुन्हा तंग झाले. हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत मिणचे गावात दुचाकी रॅली काढली. ही रॅली सावर्डे भागात जाऊन वडगाव पोलिस ठाण्याच्या समोर आली. यावेळी पोलिस ठाण्यासमोर त्यांनी ठिय्या मांडला. दोन्ही तरुणांवर देशद्रोहाची कारवाई केल्याशिवाय उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण यादव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव कारवाईच्या मागणीवर ठाम राहिला. काही युवकांनी वडगाव शहरातून रॅली काढून निषेध व्यक्त केला. ॲड. दीपक पाटील यांनी मध्यस्थी करून जमावास शांत केले. यावेळी प्रचंड तणावाचे वातावरण झाले होते. सावर्डे, मिणचे गावातील दुकाने बंद होती. याशिवाय पेठवडगाव शहरातील काही ठिकाणी दुकाने बंद झाली होती. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे, पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांच्यासह, दंगल नियंत्रक पथक तैनात केले होते.
गोडाऊन, ट्रक पेटवला
सावर्डे येथील सद्दाम मोमीन यांचे मिणचे रोडवर साखर पोत्यांचे गोडावून आहे. या गोडावूनला अज्ञातांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास आग लावली. या आगीत गोडावूनमधील सुमारे आठ लाख किमतीची साखरेची रिकामी पोती, बारदाने जळून खाक झाले. तसेच आयशर टेम्पो व त्यातील रिकामी पोती जाळली. ही आग वडगाव पालिका, कोल्हापूर महानगरपालिका, नरंदे साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. यामध्ये दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उशिरापर्यंत वडगाव पोलिसात नोंद झाली नव्हती.