जिल्हाप्रमुखांबरोबर कार्यालयही बदलते --: शिवसेनेची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:12 AM2019-09-27T00:12:49+5:302019-09-27T00:15:08+5:30

राज्यात आता पक्ष सत्तेत आहे. तसेच जिल्ह्यात दोन खासदार व सहा आमदार असताना एका छताखाली हक्काचे कार्यालय नसल्याची खंत शिवसैनिकांना आहे. मुंबईतील ‘शिवसेना भवन’च्या धर्तीवर जिल्ह्यात ‘शिवसेना भवन’ उभारावे, असा सूर सर्वसामान्य शिवसैनिकांमधून उमटत आहे.

The office also changes with the district chief | जिल्हाप्रमुखांबरोबर कार्यालयही बदलते --: शिवसेनेची स्थिती

कोल्हापुरातील पद्मा टॉकीज परिसरात शिवसेनेचे जिल्हा कार्यालय असून, येथून जिल्हाप्रमुख संजय पवार कामकाज करीत आहेत.

Next
ठळक मुद्देजिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांची स्वतंत्र कार्यालयेदोन खासदार, सहा आमदार असूनही शिवसेना भवनकडे दुर्लक्ष

प्रवीण देसाई ।
कोल्हापूर : जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार, सहा आमदार असूनही जिल्ह्याच्या ठिकाणी हक्काचे असे कार्यालय नसल्याची स्थिती आहे. पक्षाचे कामकाज जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांच्या स्वतंत्र कार्यालयातून सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्हाप्रमुख बदलत जाईल, त्याप्रमाणे जिल्हा कार्यालये बदलण्याची पद्धतच रूढ झाल्याने मुंबईतील शिवसेना भवनच्या धर्तीवर जिल्ह्यातही शिवसेना भवन व्हावे, असा सूर सर्वसामान्य शिवसैनिकांमधून उमटत आहे.

शिवसेनेच्या कोल्हापुरातील पहिल्या शाखेची स्थापना १९८६ मध्ये मित्रप्रेम तरुण मंडळ, ताराबाई रोड येथे झाली. तेव्हा पक्षाचे पहिले जिल्हाप्रमुख म्हणून सुरेश साळोखे यांची नियुक्ती केली. त्यावेळी साकोली कॉर्नर परिसरात साळोखे यांनी पहिले जिल्हा कार्यालय सुरू केले. तेथून जवळपास १९९५ पर्यंत जिल्ह्यातील संघटनेची सूत्रे हलू लागली. १९९५ला राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. त्यानंतर कोल्हापूर व तत्कालीन इचलकरंजी लोकसभा मतदारसंघासाठी दोन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती झाली. यामध्ये कोल्हापूरसाठी रामभाऊ चव्हाण व इचलकरंजीसाठी प्रा. विजय कुलकर्णी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी रामभाऊ चव्हाण यांचे कार्यालय हे पाडळकर मार्केट येथूनच सुरू होते. प्रा. कुलकर्णीसुद्धा येथूनच आपले कामकाज करीत होते.

पुढे २००१ला इचलकरंजीचे जिल्हाप्रमुख बदलून ती जबाबदारी पुंडलिक जाधव यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी आपले कामकाज इचलकरंजी येथूनच सुरू केले. पुढे २००४ ला रामभाऊ चव्हाण पदावरून बाजूला झाल्यानंतर या ठिकाणी विनायक साळोखे यांची नियुक्ती झाली. त्यांनी शाहू स्टेडियम येथील एका गाळ्यात जिल्हाप्रमुखांचे कार्यालय सुरू केले. या कार्यालयावरून पुढे चव्हाण-साळोखे असा वाद झाला. काही वर्षांनंतर रामभाऊ चव्हाण यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची पुन्हा जबाबदारी आल्याने जिल्हाप्रमुखांचे कार्यालय हे पाडळकर मार्केट येथे गेले. तेथून २००८ पर्यंत कामकाज सुरू राहिले. २००८ ला संजय पवार यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आली; तर इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात मुरलीधर जाधव यांच्याकडे सूत्रे आली. त्यामुळे जिल्हा कार्यालये पुन्हा बदलली.

पवार यांनी पद्मा टॉकीज परिसरातील आपल्या कार्यालयातून कामकाज सुरू ठेवले; तर जाधव यांनी इचलकरंजी, हुपरी येथून कामकाज सुरू ठेवले आहे. दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड, राधानगरी, कागल विधानसभा मतदारसंघांसाठी नवीन जिल्हाप्रमुख पद निर्माण करून तिथे विजय देवणे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे कार्यालय देवल क्लब परिसरात आहे.

राज्यात आता पक्ष सत्तेत आहे. तसेच जिल्ह्यात दोन खासदार व सहा आमदार असताना एका छताखाली हक्काचे कार्यालय नसल्याची खंत शिवसैनिकांना आहे. मुंबईतील ‘शिवसेना भवन’च्या धर्तीवर जिल्ह्यात ‘शिवसेना भवन’ उभारावे, असा सूर सर्वसामान्य शिवसैनिकांमधून उमटत आहे.


शहरप्रमुखांचीही स्वतंत्र कार्यालये
आमदार राजेश क्षीरसागर हे पूर्वी शहरप्रमुख होते. त्यांच्या कार्यकाळात शहर कार्यालय शनिवार पेठ येथील त्यांच्या निवासस्थानी होते. तेथूनच ते शहरातील संघटनेची सूत्रे हलवत होेते. तसेच माजी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या कार्यकाळात राजारामपुरी येथे कार्यालय सुरू होते. सध्याचे विद्यमान शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी काही महिन्यांपूर्वी खरी कॉर्नर परिसरात शहर कार्यालय सुरू केले आहे; तर शिवाजी जाधव यांचे कामकाज हे मित्रप्रेम शाखेच्या कार्यालयातून सुरू आहे.

 

Web Title: The office also changes with the district chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.