कागल साहाय्यक निबंधक कार्यालयाचा भोंगळ कारभार
By admin | Published: December 25, 2015 09:48 PM2015-12-25T21:48:18+5:302015-12-25T23:59:51+5:30
परिसरात दारूच्या बाटल्या : सहकारावर नियंत्रण ठेवणारेच अनियंत्रित
जहाँगीर शेख - कागल
कागल तालुक्यातील सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेले येथील साहाय्यक निबंधक कार्यालयच मनमानी वर्तणुकीने अनियंत्रित झाले आहे. येथील कामकाज एखाद्या खासगी आॅफिसप्रमाणे चालते. भरीस भर म्हणून कार्यालयाभोवती अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, कार्यालयीन इमारतीला लागून दारु-बीयरच्या मोकळ््या बाटल्या येथील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना का दिसत नाहीत असा सवाल नागरिक करत आहेत.
शिवाजी सोसायटीच्या आत हे साहाय्यक निबंधक कार्यालय आहे. ही इमारत जीर्ण झाली आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल तालुक्यातील सहकारक्षेत्रात होत असते. या आर्थिक व्यवहारात हे कार्यालय सहकार कायद्याप्रमाणे लक्ष ठेवते.
मात्र तालुक्यातील बंद पडलेल्या जवळपास ७० हून अधिक पत संस्था, यामध्ये अडकलेले गोरगरिबांचे लाखो रुपये, ज्या संस्था चालू आहेत; त्यांचे रेंगाळलेले लेखा परीक्षण, अस्तित्वात नसणाऱ्या पण खुंटीवर दप्तर टांगून ठेवलेल्या संस्था, सहकारी संस्थांना लूटणारे लोक यांच्याकडे या कार्यालयाने कधी गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. उलट भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या काहींची येथे कायम ऊठबस असते.
कार्यालयात ठरावीक दिवशीच अधिकारी कर्मचारी भेटतात. अन्यथा ते म्हणे सतत सहकारी संस्थांच्या कामकाजासाठी कार्यालयाबाहेर राहून काम करीत असतात. चांगल्या पद्धतीने सहकारी संस्था चालविणारे लोक तर या कार्यालयाला खूप दचकून असतात. अशा अनेक कथा येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांबाबत सुरू असतानाच कार्यालयात शिस्त, स्वच्छतेच्या बाबतीत तर सारा आनंदीआनंदच आहे.