मौनी विद्यापीठाच्या कार्यालयास टाळे

By Admin | Published: October 6, 2015 12:57 AM2015-10-06T00:57:09+5:302015-10-06T00:57:57+5:30

विश्वस्त कार्यालयाची तोडफोड : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आंदोलन

The Office of the University of Maunai | मौनी विद्यापीठाच्या कार्यालयास टाळे

मौनी विद्यापीठाच्या कार्यालयास टाळे

googlenewsNext

गारगोटी : गेली पंधरा वर्षे मौनी विद्यापीठात सुरू असलेल्या हुकूमशाही व दडपशाही कारभाराविरोधात संतप्त युवक कार्यकर्त्यांनी मौनी विद्यापीठाची सर्व कार्यालये बंद पाडून विश्वस्त कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडल्या. भविष्यात स्थानिक आणि भुमिपुत्रांवर अन्याय केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिला. योग्य निर्णय न झाल्यास हे आंदोलन बेमुदत सुरू राहील, असे जि. प.चे सदस्य राहुल देसाई यांनी सांगितले. मौनी विद्यापीठाचा कारभार गेली पंधरा वर्षे माजी मंत्री सतेज पाटील यांच्याकडे आहे. नोकरभरती, विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया, विश्वस्त संचालक निवड या कारणांनी स्थानिक कार्यकर्त्यांत रोष निर्माण झाला होता. २५ जुलै रोजी मौनी विद्यापीठाची निवडणूक पार पडली. ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी रदबदली सुरू झाल्या. यावेळी मध्यस्थांकडून व्यवस्थापन मंडळावर दोन सदस्य घेण्यावर सर्वपक्षीय आणि माजी मंत्री पाटील यांच्यात समेट झाला. व्यवस्थापन समितीवर प्रिन्स शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून माजी आमदार बजरंग देसाई यांना संस्थेने ठराव दिला. त्याचवेळी सदाशिव बरगे यांनीही याच संस्थेचा ठराव ऐन अध्यक्ष निवडीवेळी दाखल केला. या दोन ठरावांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणताही ठोस निकाल दिला नाही. हा ठराव डावलत अध्यक्ष निवड पार पडली. तालुक्याबाहेरील सुमारे दोनशे कर्मचारी घेतले असल्याचा आरोप आंदोलनकर्ते करीत होते.
याबाबत विद्यापीठ व्यवस्थापनाकडे वारंवार चौकशी केली असता त्याची दखल घेतली गेली नाही. या रागापोटी सोमवारी सकाळी दहा वाजता तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते जमा होऊन विद्यापीठाच्या विश्वस्त कार्यालयाकडे गेले. तेथे संचालक उपस्थित नसल्याने सर्व कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले.
यानंतर आंदोलनकर्ते शाहू वाचनालयात जमा झाले. यावेळी शासकीय प्रतिनिधी अलकेश कांदळकर म्हणाले, झुंडशाही व गुंडशाही कारभाराला आळा घालून विद्यापीठ वाचवण्यासाठी सर्व तालुक्यातील तरुणाईला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही.
माजी आमदार बजरंग देसाई म्हणाले, जळीत गोठा ते नोकरभरतीत असे अनेक गैरप्रकार सुरू असून विद्यापीठ संपविण्याचा घाट ही मंडळी करीत आहेत. या बैठकीस कॉ. सम्राट मोरे, जि. प.चे सदस्य राहुल देसाई, ‘गोकुळ’चे संचालक धैयशील देसाई, शामराव देसाई यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)


मौनी विद्यापीठप्रश्नी लोकांची दिशाभूल : सतेज पाटील
कोल्हापूर : गारगोटी येथील मौनी विद्यापीठ बंद पाडण्याचा प्रकार हा लोकांची दिशाभूल करणारा आहे. वस्तुस्थिती डावलून संबंधित लोक वेगळेच विषय पुढे करीत आहेत, या प्रकाराचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष व माजी मंत्री सतेज पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, मौनी विद्यापीठात विश्वस्त निवडीवरून वादाचा प्रसंग उद्भवला आहे. मात्र, संस्थेचे कामकाज बंद पाडण्याचा हा प्रकार दुर्दैवी आहे. प्रिन्स शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थेकडे एक ऐवजी दोन ठराव दाखल झाले आहेत. माजी आमदार बजरंग देसाई व सदाशिव बरगे यांच्या नावे दोन ठराव दाखल झाले आहेत. यातून वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. दोघांनी याप्रश्नी धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडून कायदेशीर बाबी समजून घेणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्याचे दिसते. मौनी विद्यापीठाचा राज्यभर नावलौकिक आहे. यामुळे येथे गुंडगिरीचा प्रकार योग्य नाही. वादाचा मुद्दा कायदेशीर मार्गाने सोडवावा. दुर्दैवाने ‘गोकुळ’च्या चेअरमनपदासाठी काय करतो हे दाखविण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे.

विद्यापीठाचे संचालक आणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. बी. टी . ढेरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, एका संस्थेचे दोन ठराव आलेले आहेत. त्याबाबत आम्ही धर्मादय आयुक्त कार्यालयाकडे योग्य ते मार्गदर्शन मागविणार आहे, तर आंदोलनकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: The Office of the University of Maunai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.