१४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरून अधिकारी धारेवर
By Admin | Published: January 14, 2016 01:02 AM2016-01-14T01:02:22+5:302016-01-14T01:02:22+5:30
पंचायत समिती मासिक बैठक : सदस्यांना बैठकीला न बोलविल्याने पदाधिकारी संतप्त
चंदगड : शासनाचा १४ वा वित्त आयोग थेट ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे. हा निधी कसा वापरावा यासंदर्भात पंचायत स्तरावर विस्तार अधिकाऱ्यांनी नुकतीच तालुक्यातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांची बैठक गटविकास अधिकारी एस. डी. सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला पंचायत समिती सदस्यांना निमंत्रण न दिल्याने आजच्या बैठकीत सदस्यांनी ग्रामपंचायत विभागालाच उपसभापती शांताराम पाटील यांनी धारेवर धरले.
पंचायत समिती मासिक बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती ज्योती-पवार होत्या. गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांनी स्वागत केले. कक्ष अधिकारी बाजीराव पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले.
पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना साधा प्रोटोकॉल सांभाळता येत नाही. कुठलीही बैठक होत असताना सदस्यांना त्याची कल्पना द्यावी लागते; पण अधिकारी सदस्यांना बैठकीची कल्पना न देता बैठक झाल्यावर कळवितात. यापुढील बैठकींना तरी सदस्यांना कळवत जा, अन्यथा तालुक्याचा कारभार अधिकाऱ्यांनीच करा, असा टोला लगावला. यावेळी १४ व्या वित्त आयोगाचा निधी पंचायत समितीला खर्च करण्याचा अधिकार मिळावा, असा ठराव करण्यात आला.
शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे नामांतर करण्यात आले असून, यापुढे ही योजना गोपीनाथ मुंठे शेतकरी अपघात विमा योजना या नावाने ही योजना कार्यान्वित झाल्याने तालुका कृषी अधिकारी आर. आय. रूपनर यांनी सांगून शेतकरी अपघात विम्याची सात प्रकरणे मंजूर झाली आहेत, तर सात प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ३६ गावांतील माती परीक्षण करण्यात आले असून, शेतकऱ्यांना माती परीक्षा कार्ड देणार असल्याची माहिती दिली.
तालुक्यात नऊ ठिकाणी नवीन एस. टी. बससेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक निमंत्रक प्रल्हाद शिरगांवकर यांनी सांगून चंदगड फाटा, चंदगड न्यायालयासमोरील रस्त्यावर खोकीधारकांनी अतिक्रमण केले आहे. एस.टी. चालविताना अडचणी येत असून, भविष्यात अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे बांधकाम विभागाने काढावीत, अशी मागणी केली. यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता व्ही. एस. घाटगे यांचा सेवानिवृत्तीबद्दल पंचायत समितीच्या वतीने सभापती ज्योती पवार-पाटील व उपसभापती शांताराम पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बबनराव देसाई, नंदिनी पाटील, कल्लाप्पा नाईक यांनी यावेळी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
...आणि सदस्य नाईक यांनी चार वर्षांतील मौन सोडले
दिंडलकोप येथे एस.टी. कधी सुरू करणार? अशी विचारणा एस.टी.च्या अधिकाऱ्यांना सदस्य कल्लाप्पा नाईक यांनी विचारले. त्यांच्या या प्रश्नामुळे गेल्या चार वर्षांतील मौन सोडले, अशी प्रतिक्रिया एका सदस्यांने व्यक्त केली.