मस्ती कुणाला हे अधिकारी जाणतात..

By admin | Published: June 1, 2016 01:34 AM2016-06-01T01:34:08+5:302016-06-01T01:41:11+5:30

हाळवणकरांचा मुश्रीफांवर वार : पाठीत खंजीर खुपसणारा कसला ‘मदारी म्हेतर..?’

The officer knows who the fun. | मस्ती कुणाला हे अधिकारी जाणतात..

मस्ती कुणाला हे अधिकारी जाणतात..

Next

कोल्हापूर : तमनाकवाडा (ता. कागल) येथील पाणी परिषदेतील टिकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी मलाच मस्ती आल्याची दर्पोक्ती केली; पण गेल्या पंधरा वर्षांत मंत्रिपदावर असताना आणि सत्ता गेल्यानंतरही मस्ती कोणाला आली होती किंवा आहे, हे जिल्ह्यातील जनता आणि शासकीय अधिकारीही जाणतात, असा टोला भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी मंगळवारी लगावला.
मुश्रीफ यांनी हाळवणकर यांना सत्तेची मस्ती आल्याची टीका सोमवारी केली होती. त्यास हाळवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. पत्रकात म्हटले आहे, ‘मुश्रीफ हे स्वयंघोषित नेते आहेत. इतिहासातील अल्पसंख्याक स्वामीनिष्ठ प्रभुतीची उपमा स्वत:च स्वत:ला देतात. ‘मदारी म्हेतर’ हे शिवाजी महाराजांचे स्वामीनिष्ठ सेवक होते. त्यांनी स्वत:चे प्राण धोक्यात घालून शिवरायांना वाचविले म्हणून आम्ही स्वराज्य पाहिले; पण याउलट ज्या खासदार सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे, शामराव भिवाजी पाटील या नेत्यांनी मुश्रीफांना बोटाला धरून मोठे केले, त्यांच्याच पाठीत या ‘आधुनिक मदारी म्हेतर’ने मात्र खंजीर खुपसला. त्यामुळे मुश्रीफांनी ‘मदारी म्हेतर’सारख्या प्रामाणिक स्वामीनिष्ठ सेवकांचा अपमान करू नये.
वेळ पडेल तेव्हा जात आणि राजकीय फायद्यासाठी बहुजन समाज या संकल्पनेतून आजपर्यंत कागल तालुक्यातील नेत्यांना आणि जनतेला फसवून व बुद्धीभेद करून चारवेळा निवडून आलात, पण येत्या विधानसभेच्या निवडणुकीत तरुण पिढी आणि तुमच्या कृष्णकृत्याने कंटाळलेली जनताच तुम्हाला धडा शिकवेल. गतनिवडणुकीतही तुम्हाला निवडून येताना घाम फुटला, हे विसरू नका. त्यामुळे तुम्ही माझ्या निवडणुकीची काळजी करू नये.
चिकोत्रा खोऱ्यातील मुश्रीफांचे प्रेम पुतना मावशीचे आहे. कारण आपल्या सात पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी जनतेच्या पैशांवर खासगी साखर कारखाना उभारला. स्वत: अल्पसंख्याक असल्याने भविष्यात अडचणी येऊ नयेत व बहुजन समाजाला बरे वाटावे म्हणून त्यांनी या कारखान्यास ‘सरसेनापती संताजी घोरपडे’ यांचे नाव देऊन पैसे मिळविण्याचा धंदा चालू केला. या कारखान्याच्यामार्फत मुश्रीफ कुटुंबीयांची चंगळ सुरू आहे. मात्र, कागल तालुक्यातील गोरगरीब जनता संजय गांधी निराधार अनुदान व कंत्राटी पद्धतीवर पगार घेऊन जगत आहे. राजकारण हा धंदा म्हणून तुम्ही स्वीकारला आहात; पण आम्ही मात्र राजकारण हे व्रत म्हणून स्वीकारले आहे. हा तुमच्या-आमच्यातला फरक आहे. माझ्या टीकेला उत्तर देणार नाही, असे जाहीर करून मुश्रीफ यांनी वस्तुस्थितीच मान्य केली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या टीकेला फारशी किंमत नसल्याचा टोला आमदार हाळवणकर यांनी लगावला आहे.

द्या उत्तर : पंधरा वर्षांत काय केले..?
नागनवाडी प्रकल्प मीच पूर्ण करणार म्हणणाऱ्या मुश्रीफांनी १५ वर्षे मंत्रिपदाच्या काळात काय केले? जलसंपदा खाते ताब्यात असतानाही तो पूर्ण का केला नाही? याचे उत्तर आधी द्यावे. स्वत:च्या मालकीचा कोट्यवधीचा साखर कारखाना एक वर्षात उभा राहतो. मग नागनवाडी प्रकल्प का उभारू शकले नाहीत?
‘सीनिअर’ पण बुद्धीने नव्हे..
मुश्रीफसाहेब तुम्ही सीनियर आहात, ते केवळ वयाने. बुद्धीने नव्हे. कारण उपकारकर्त्या विक्रमसिंह घाटगे, कै. मंडलिक व प्रामाणिक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबत आजपर्यंत आपण जे तारे तोडले ते जिल्ह्याला माहीत असल्याची टीका हाळवणकर यांनी केली आहे.
राष्ट्रवादी संपविलात...
केवळ बहुजन नेत्यांच्यात वाद-विवाद लावून सत्तेची पोळी आपण आजपर्यंत खाल्ली आहे. कधी विनय कोरे, तर कधी के. पी. पाटील, तर कधी महाडिक बंधू, तर कधी ए. वाय. पाटील आदी बहुजन नेत्यांचा चेहरा पुढे करत पडद्याआडून सर्वांना राजकीयदृष्ट्या मोडून काढले. या सर्वांचे राजकीय खच्चीकरण केले. आता प्रा. संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, समरजित घाटगे आदींचे चेहरे पुढे करून राजकारणातील आपले अस्तित्व टिकवत आहात. राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व संपविण्याचा आजवर प्रयत्न केलात हे लपून राहिलेले नाही.
मुश्रीफसाहब को गुस्सा क्यों आता हैं...
मुश्रीफसाहब को गुस्सा क्यों आता हैं. कारण मुश्रीफ आपल्या सावलीलाही भितात, ही वस्तुस्थिती आहे. खोटे अवसान आणून स्वत:चा स्वार्थ साधण्याचे बंद करावे व टीका करताना भान ठेवावे, असेही हाळवणकर यांनी म्हटले आहे.

Web Title: The officer knows who the fun.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.