अधिकारी-पदाधिकारी हतबल

By admin | Published: May 27, 2016 09:45 PM2016-05-27T21:45:29+5:302016-05-27T23:23:31+5:30

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या : व्यसनी, कामचुकारांचा संघटनेच्या आडून दबाव

Officer-office bearer Hatabal | अधिकारी-पदाधिकारी हतबल

अधिकारी-पदाधिकारी हतबल

Next

संजय पारकर -राधानगरी -जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याचे सत्र सुरू असताना ज्या शिक्षकांवर लोकांच्या गंभीर तक्रारी आहेत अशांच्या मात्र बदल्या होत नाहीत. शिक्षक संघटनांनी आपल्याला हवे तसे कायदे करून घेतल्याने स्थानिक अधिकारी, पदाधिकारी याबाबत हतबल झाल्याचे दिसत आहेत. मात्र, व्यसनी, कामचुकार, ज्यांना शिकवताच येत नाही, जे केवळ पाट्या टाकण्याचे काम करून भरमसाट पगार घेतात अशा शिक्षकांना बदलीची भीतीच नाही. यामुळे अनेक पिढ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.सध्या सर्वत्र खासगी इंग्रजी शाळांचे पेव फुटत आहे. सरकारी प्राथमिक शाळाच्या पटसंख्येवर त्याचा परिणाम होत आहे. मात्र, तरीही ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना जिल्हा परिषेदेच्या शाळेशिवाय पर्याय नाही. शासन यासाठी मोठा खर्च
करते. जिल्हा परिषद या शाळा गुणवत्तापूर्ण व्हाव्यात यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहे. शाळेसाठी अहोरात्र राबणाऱ्या शिक्षकांनी असे अनेक प्रयोग यशस्वी करून आपले, शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. इमानेइतबारे काम करणारे अनेक शिक्षक आहेत. अशा शिक्षकांच्या गावातून बदल्या
होऊ नयेत म्हणून काही
ठिकाणी पालक-ग्रामस्थ प्रयत्नशील असतात.
दुसऱ्या बाजूला काही मोजके शिक्षक या सर्वाला गालबोट लावतात. दारू पिऊन शाळेत येणे, मटका-जुगार याच्या आहारी जाणे, शाळेत मुलांना शिकविण्याऐवजी नको ते धंदे करणे, सतत मोबाईलवर बोलणे, शिकवताच येत नसल्याने केवळ पाट्या टाकण्याचे काम करणे, कामचुकारपणा करणे अशा प्रकारच्या तक्रारी या शिक्षकांबाबत आहेत. पूर्वी बदल्यांबाबत काही अधिकार पंचायत समिती स्तरावर सभापतींना होते. त्यावेळी तक्रारी असणाऱ्या किंवा स्थानिक अडचणीनुसार बदल्या व्हायच्या. त्यामुळे अशा शिक्षकांना थोडी भीती असायची.
शिक्षकांच्या राज्यस्तरावर मजबूत संघटना आहेत. त्यांचा राजकारण्यावर प्रभाव आहे. त्यामुळे बदल्याबाबत काही कायदे त्यांनी आपल्याला हवे तसे करून घेतले आहेत. अर्थात बदल्याच्या अधिकाराचा गैरवापर थांबविण्याचा यात हेतू असला तरी त्याचा काही ठिकाणी मुलांना फटका बसत आहे. सध्या शिक्षकांना एकाच शाळेत पाच वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्याची बदली करता येत नाही. तक्रार झाल्यास चौकशी करून त्याला निलंबित करता येते. मात्र, अशी कारवाई करण्याचे धाडस फारच कमी वेळा केले जाते. अशावेळी त्याच्या कुटुंबाचा विचार केला जातो; मात्र मुलांच्या भवितव्याकडे दुर्लक्ष केले जाते. वारंवार तक्रारी करूनही अशा शिक्षकांच्या बदल्याचे अधिकार नसल्याची हतबलता अधिकारी व्यक्त करतात, तर पालकांना मात्र आपल्या मुलाच्या भवितव्याची चिंता लागून राहते.


पदोन्नतीव्यतिरिक्त शिक्षकांची एकाच ठिकाणी पाच वर्षे सेवा झाल्याशिवाय बदली करता येत नाही. तक्रार असल्यास त्याची चौकशी करून अहवाल जिल्हा परिषद व तेथून विभागीय आयुक्तांना पाठवावा लागतो. त्याच्या मंजुरीनंतर बदली होते. निलंबनाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत.
-एम. एस. मांडे, गटशिक्षणाधिकारी राधानगरी

काही शिक्षकांबद्दल गंभीर तक्रारी असतात. त्यांच्या बदल्या न झाल्यास पाच वर्षे एकाच शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. अशावेळी स्थानिक पातळीवर पूर्वीप्रमाणे काहीतरी अधिकार असणे आवश्यक आहे.
-गोविंदराव चौगले, अध्यक्ष
शाळा व्यवस्थापन समिती
सोन्याची शिरोली (ता. राधानगरी)

Web Title: Officer-office bearer Hatabal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.