ग्रामस्थांकडून अधिकारी धारेवर

By admin | Published: November 7, 2014 12:32 AM2014-11-07T00:32:36+5:302014-11-07T00:49:11+5:30

दूषित पाणी प्रश्न : मासे मृत; स्वच्छ पाणी न मिळाल्यास बस्तवाड ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Officer from the villagers Dharevar | ग्रामस्थांकडून अधिकारी धारेवर

ग्रामस्थांकडून अधिकारी धारेवर

Next

कुरुंदवाड : कृष्णा नदीतील दूषित पाण्यामुळे बस्तवाड (ता. शिरोळ) येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने दुसऱ्या दिवशीही आरोग्य विभागाची यंत्रणा सक्रिय होऊन साथ आटोक्यात आणत आहे. दरम्यान, आज, गुरुवारी विविध अधिकाऱ्यांनी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली, तर दूषित पाणीप्रश्नी संतापलेल्या ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अतिरिक्त अधिकारी डॉ. व्ही. डी. नांद्रेकर यांना धारेवर धरले. दूषित पाणी तपासणी अहवाल दोन दिवसांत न मिळाल्यास, तसेच स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास सोमवारी (दि. १०) आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
कृष्णा नदीतील दूषित पाण्याचा फटका बस्तवाड ग्रामस्थांना बसत आहे. सुमारे पन्नासहून अधिक नागरिकांना दूषित पाण्याची बाधा होऊन उलटी, जुलाब यासारखे साथीचे आजार होत असल्याने तालुका आरोग्य विभागाची यंत्रणा सक्रिय होऊन कामाला लागली आहे. ग्रामस्थांना पिण्यासाठी दुसऱ्या दिवशीही दत्त साखर कारखाना, गुरुदत्त साखर कारखाना व कुरुंदवाड नगरपालिकेच्यावतीने टॅँकरनेच पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सायंकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी राजेश आवटी यांनी गावाला भेट देऊन पाण्याचे नमुने घेऊन गेले, तर तहसीलदार सचिन गिरी, पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, पंचायत समिती सभापती शीला पाटील, आदींनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दुपारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नांद्रेकर, जिल्हा साथीरोग अधिकारी डॉ. यादव यांनी ग्रामपंचायतीमध्ये बसून साथीची माहिती घेतली; मात्र दूषित पाण्याबद्दल ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांची जबाबदारी झटकल्याने संतप्त ग्रामस्थांनी डॉ. नांद्रेकर यांना चांगलेच धारेवर धरले. पाणी तपासणी अहवाल आल्यानंतर त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना योग्य तो अहवाल देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
तपासणी अहवाल त्वरित उपलब्ध करून दोषींवर कारवाई करावी, तसेच पाण्याचा प्रवाह वाढवून नदी शुद्ध करावी, अन्यथा सोमवारी संपूर्ण ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा अशोक मगदूम यांनी दिला आहे.
बस्तवाड ते अकिवाटपर्यंतच्या पट्ट्यातच दूषित पाणी
पंचगंगेतील दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळून कृष्णाही दूषित होते; मात्र पंचगंगेचे पाणी अद्याप स्वच्छ आहे.
असे असतानाही बस्तवाड ते अकिवाटपर्यंतच्या पट्ट्यातच नदीच्या या गावांच्या बाजूलाच काळेकुट्ट व दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने ग्रामस्थ व अधिकारी वर्गातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
नजीकच्या कोणत्या कारखान्याचे पाणी नदीत मिसळत आहे काय? याचा तपास घेतला जात आहे.

कृष्णा नदीला प्रदूषित पाणी आल्यामुळे बस्तवाड (ता. शिरोळ) येथे साथीचे आजार पसरले असून, नदीतील मासे असे मृत्युमुखी पडले आहेत. दुसऱ्या छायाचित्रात बस्तवाड (ता. शिरोळ) येथे जिल्हा अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी व्ही. डी. नांद्रेकर यांच्यावर ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले.

Web Title: Officer from the villagers Dharevar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.