अधिकारी-कर्मचाऱ्यांनीच घेतला हातात झाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:11+5:302021-01-16T04:28:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत शुक्रवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपलीच कार्यालये असलेल्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी चक्क झाडू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत शुक्रवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपलीच कार्यालये असलेल्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी चक्क झाडू हातात घेतला आणि बघता बघता अवघ्या अर्ध्या तासात परिसर लखलखीत झाला. वरिष्ठ भू-वैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेतला.
या इमारतीत विविध विभागांची २० कार्यालये आहेत. येथे अभ्यागतांची वर्दळ असल्याने परिसरात कचरा साठतो. परंतु त्याची दैनंदिन स्वच्छता होत नसल्याने परिसराला कळा आली होती. ती पाहून गोसकी यांनी स्वच्छता मोहीम राबविण्याचा विचार मांडला. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छतेसाठी वेळ दिला. अर्ध्या तासात कचऱ्याचे ढिगारे परिसरात गोळा झाले. या मोहिमेत स्वच्छतादूत अमित कुलकर्णी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हा माहिती कार्यालय, मुद्रांक कार्यालय, राधानगरी प्रांत कार्यालय, ग्राहक न्यायालय, विभागीय माहिती कार्यालय, तहसील कार्यालय संजय गांधी कार्यालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आदी कार्यालयांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.
--
फोटो नं १५०१२०२१-कोल-स्वच्छता मोहिम
ओळ : कोल्हापुरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत शुक्रवारी अधिकारी-कर्मचारी यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.