केर्ले मार्गावरील कचऱ्यावरुन अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:23 AM2021-03-20T04:23:13+5:302021-03-20T04:23:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : शिवाजी पूल ते केर्ले या राज्य मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात लोकांनी कचरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : शिवाजी पूल ते केर्ले या राज्य मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात लोकांनी कचरा टाकल्याने या रस्त्याचा अक्षरश: कोंडाळा झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुर्गंधी पसरली असून, या रस्त्याच्या स्वच्छतेची नेमकी जबाबदारी कोणाची? असा प्रश्न करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मीनाक्षी पाटील होत्या. या सभेत शिक्षण, ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाला चांगलेच धारेवर धरण्यात आले.
शिवाजी पूल ते रत्नागिरी या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. या कामाला गती द्यावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली. ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामाच्या गुंठेवारीचा प्रश्न प्रदीप झांबरे यांनी उपस्थित केला. नवीन बांधकाम करताना रस्ते सोडले नाहीत, गटार नाही. बिल्डर लॉबी मनाला येईल तसे काम करते, त्यांच्यावर अंकुश कोणाचा आहे, असा प्रश्नही झांबरे यांनी विचारला. तर सुनील पोवार यांनी बिल्डर, ग्रामपंचायत पैसे खाणार आणि नाहक त्रास पंचायतीला का, असा प्रश्न उपस्थित केला. पंचायत समिती सदस्यांना अधिकारी कोणत्याही गोष्टीची माहिती देत नाहीत. सदस्यांना अधिकार आहेत की नाहीत, हे एकदा आम्हाला सांगा, या शब्दात विजय भोसले यांनी संताप व्यक्त केला. तर राजेंद्र सूर्यवंशी यांनीही आम्हाला कोणी विचारत नाही, अंधारात ठेवतात, असा आरोप केला. कोविड लसीकरणाच्या बाबतीत पंचायत समिती पाठी आहे. म्हणावी तशी जनजागृती केली जात नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवावा, अशी मागणी रमेश चौगले, राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. या सभेत अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी रक्कम वाढवून दहा लाख रुपये मिळावेत, अशी मागणी अश्विनी धोत्रे यांनी केली. पशुधनाबाबत विमा कंपनी व्यवस्थित सेवा देत नाही, त्यामुळे चांगली सेवा देणाऱ्या विमा कंपनीकडे येथून पुढे विमा उतरावा, असा ठराव सागर पाटील यांनी मांडला. करवीर तालुक्यात बचत गटांचे काम चांगल्याप्रकारे सुरू असून, ते आणखी गतिमान केले जाईल, अशी माहिती उमेद अभियानाच्या तालुका व्यवस्थापक आरती पाटील यांनी सभागृहात दिली. यावेळी उपसभापती अविनाश पाटील, गटविकास अधिकारी जयवंत उगले, शोभा राजमाने, इंद्रजीत पाटील, अर्चना खाडे, मोहन पाटील, सविता पाटील, यशोदा पाटील उपस्थित होते.
चौकट:
पंच म्हणून इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बोलवा
शासकीय पंच म्हणून पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना वरचेवर बोलावले जाते. जिल्हा परिषद व अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही करवीर पोलीस व लाचलुचपत कार्यालयाने या कामासाठी बोलवावे, असा ठराव सभेत चंद्रकांत पाटील यांनी मांडला. यावेळी सुनील पवार यांनी काही शाळेत शिक्षक कामावर येत नसतानाही त्यांचा पगार नित्यनेमाने काढला जातो, असा आरोप करत ही एक साखळी आहे. यात दोषी असलेल्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. उपसभापती अविनाश पाटील यांनी याबाबत ग्रामपंचायतीने पंचायत समिती सदस्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची माहिती दिली पाहिजे, अशी मागणी केली.